esakal | त्याने केला नवीन व्यवसायाचा शुभारंभ...पण पुण्यावरून येताना नियतीने खळाळता "सागर' आटवला! 
sakal

बोलून बातमी शोधा

accident

व्यवसायाने मरीन इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला उच्चशिक्षित अन्‌ सध्या शहरातच राष्ट्रीय महामार्गालगत उभारलेल्या मनभक्ती ऑटो स्पाज्‌चा संचालक स्नेहल उर्फ सागर राजेंद्र पाटील (वय ३१, रा. माधव नगर, साक्री) याचा पुण्याहून घरी परतत असताना साक्री- नवापूर महामार्गावर हॉटेल हिरा गार्डन लगत अपघातात दुर्दैवी अंत झाला.

त्याने केला नवीन व्यवसायाचा शुभारंभ...पण पुण्यावरून येताना नियतीने खळाळता "सागर' आटवला! 

sakal_logo
By
जगदीश शिंदे

साक्री : शहरात आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अपघाताची वार्ता वाऱ्यासह पसरली, अपघात कुणाचा झाला? हा प्रश्न सारेच विचारू लागले... घटना कळल्यानंतर मात्र साक्रीकरांकडे हळहळ व्यक्त करण्यापलीकडे कुठलाही मार्ग नियतीने शिल्लक ठेवला नव्हता. कारण नियतीच्या क्रूर ओहोटीत खळाळता सागर कायमचा आटलेला होता. 

शहरातील सी. गो. पाटील महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आर. बी. पाटील यांचा चिरंजीव तथा व्यवसायाने मरीन इंजिनिअरिंगची पदवी घेतलेला उच्चशिक्षित अन्‌ सध्या शहरातच राष्ट्रीय महामार्गालगत उभारलेल्या मनभक्ती ऑटो स्पाज्‌चा संचालक स्नेहल उर्फ सागर राजेंद्र पाटील (वय ३१, रा. माधव नगर, साक्री) याचा पुण्याहून घरी परतत असताना साक्री- नवापूर महामार्गावर हॉटेल हिरा गार्डन लगत अपघातात दुर्दैवी अंत झाला. नवीनच उभारलेल्या व्यवसायासाठी धावपळ करीत राहणारा सागर १९ ऑगस्‍टला व्यावसायिक कामानिमित्त पुणे येथे (एम. एच १६ एटी ५०३३) या मारुती इर्टिगा वाहनाने मित्रांसमवेत गेला होता. काल दिवसभरात पुणे येथील काम आटोपून रात्रीचा प्रवास करीत गावाकडे परतत असताना महामार्गावरील दहीवेल गावावरून सुरपान (ता. साक्री) येथील मित्राला घरी पोहोचवून घर गाठत असताना काळाने घाला घातला, अन समोरून येणाऱ्या मालट्रक (जीजे २५ यू १२ २४) याने समोरून दिलेल्या धडकेत सागरला आपला प्राण गमवावा लागला, तर अन्य एक मित्र हर्षद भिकनराव सोनवणे (वय २४) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील सूमालती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची वार्ता कळताच साक्री शहराचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी, सोमनाथ पाटील, पोपट मारनर साहाय्यक पोलिस निरीक्षक निकम, सोनवणे आणि अन्य सहकाऱ्यांसमवेत वेळीच घटनास्थळी धाव घेत आपले कर्तव्य बजावले. मात्र जखमी सागर यास साक्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 
 
युवा व्यावसायिकाचा अंत 
विद्यार्थिप्रिय आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी कार्यक्रम अधिकारी असलेले तथा ज्यांनी श्रममुल्य आणि सामाजिक समता तालुक्यातील शेकडोवर विद्यार्थ्यांत रोवली अशा मुळ लोहगड ता. धुळे येथील असलेल्या प्रा. आर. बी. पाटील यांचा चिरंजीव म्हणून नव्हे, तर एक उत्तम व्यावसायिक तसेच उच्च शिक्षितांनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय करून देखील चांगले जीवन जगता येणे शक्य आहे असा वस्तुपाठ ठेवणारा युवा व्यावसायिक आज दुर्दैवाने अपघातात गेला. ही बाब शहरासह पंचक्रोशीतील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीच्या मनाला चटका लावून जाणारी ठरते आहे. 

संपादन : राजेश सोनवणे 
 

loading image