esakal | आजी-माजी सरपंचांनी केली कमाल; कोरडवाहू क्षेत्र बनविले बागायतीदार !   
sakal

बोलून बातमी शोधा

आजी-माजी सरपंचांनी केली कमाल; कोरडवाहू क्षेत्र बनविले बागायतीदार !   

आजी-माजी सरपंचांनी वाल्हवेत लोकसहभागातून गाळ उपसण्याचे कार्य केले. ते यशस्वी झाल्याने जलपातळी वाढली. विहिरी, विंधन विहीर पुनरुज्जीवित झाल्या.

आजी-माजी सरपंचांनी केली कमाल; कोरडवाहू क्षेत्र बनविले बागायतीदार !   

sakal_logo
By
रोहिदास गायकवाड


छडवेल-कोर्डे ः गावस्वयंपूर्णतेत आजी-माजी सरपंचांची कमाल, असे सुखद चित्र वाल्हवे (ता. साक्री) येथे अनुभवास मिळते. लोकसहभाग, विधायक प्रतिनिधी आणि शासन-प्रशासनाकडून एखादी योजना चांगल्या प्रकारे राबविल्यास हमखास लोककल्याणाचे कार्य उभारते. त्यास वाल्हवे येथील गाळमुक्त तलाव योजना पुष्टी देते. 

आवश्य वाचा- खडसेंनी दिले राष्ट्रवादीत जाण्याचे स्पष्ट संकेत; जयंत पाटलांच्या ट्विट केले रिट्विट !

सरपंच न्हानाजी अहिरे, माजी सरपंच चेतन महाले यांनी तीव्र पाणीटंचाईचे वाल्हवे गाव आज पाण्याने स्वयंपूर्ण केले आहे. हिवरेबाजार व बारीपाडासारख्या आदर्शवत गावांना सामूहिक दिलेल्या भेटीतून प्रेरणा घेत आजी-माजी सरपंचांनी वाल्हवेत लोकसहभागातून गाळ उपसण्याचे कार्य केले. ते यशस्वी झाल्याने जलपातळी वाढली. विहिरी, विंधन विहीर पुनरुज्जीवित झाल्या. त्यामुळे पारंपरिकऐवजी आधुनिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. 

तलाव गावाचा आत्मा 
साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील वाल्हवे सर्वांत उंच ठिकाण. ते नंदुरबार, नवापूर आणि साक्री या तीन तालुक्यांच्या सीमेवर आहे. गावाच्या उत्तर, पश्र्चिम व दक्षिणेला सरासरी ३०० ते ५०० फूट खोल दऱ्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी वाहून जाते. त्यामुळे ९० टक्के कोरडवाहू शेती होती. पाण्याची गरज भागविण्यासाठी पूर्वजांनी गावाच्या उत्तरेकडील नाल्यास मातीबांध केल्याने त्यास तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. हा तलाव मुख्य जलस्रोत आहे. त्यात गाळ साचतो. 

प्रशासनाचे मौलिक सहकार्य 
पाच ते सहा एकर परिसर असणाऱ्या तलावाची खोली सरासरी २५ ते ३० फूट आहे. त्यात दर वर्षी गाळामुळे तलावाची खोली १० ते १५ फूटच उरली. जूनपर्यंत पाणीपुरवठा करणारा तलाव फेब्रुवारीत कोरडा होत असे. त्यामुळे दर वर्षी ग्रामस्थ व जनावरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते होते. यात २०१८-२०१९ ला शासनाची गाळमुक्त तलाव अभियान योजना आली. तीत सहभागाचे होतकरू तरुणांनी ठरवले. सरपंच न्हानाजी अहिरे, माजी सरपंच चेतन महाले यांनी पुढाकार घेत १५ दिवसांत धुळे प्रांताधिकारी कार्यालयात प्रस्ताव दिला. त्यात पाच हजार चौरसमीटर गाळ काढण्यास मंजुरी मिळाली. काटेकोर नियोजनातून १०० ते २०० रुपयांना माफक दराने शेतकऱ्यांना गाळाचा पुरवठा झाला. कामाचा दर्जा पाहून प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी आणखी दहा हजार चौरसमीटर गाळ काढण्यास परवानगी दिली. उत्स्फूर्त लोकसहभागामुळे सरासरी १५ हजार चौरसमीटर गाळ काढला. तो ४० एकर खडकाळ नापीक जमिनीवर पसरविला. जून २०१९ च्या पावसाळ्यात तलाव भरल्यावर आठ फूट जलपातळी शिल्लक होती. तलावात वर्षभर साठा राहिल्याने गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पातळी कायम ४० फूट राहिली. गावाला व जनावरांना मुबलक पाणीपुरवठा झाला. तलाव परिसरातील २० ते २५ विहिरींची पातळी वाढल्याने शेती बागायती झाली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे