सोळा हजार शेतकऱयांना अतिवृष्टी अनुदानाची प्रतिक्षा !

सोळा हजार शेतकऱयांना अतिवृष्टी अनुदानाची प्रतिक्षा !

देऊर  : जिल्ह्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये क्यार व महाचक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अवकाळी पावसामुळे तालुक्यातील पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. यात ८३ हजार ४७१ आपदग्रस्त शेतकऱ्यांना मदत व सवलत शासनाने दिली. यासाठी धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना ७६ कोटी १५ लाख ४३ हजार ९९३ आवश्यक निधी होता. पैकी दोन टप्प्यांत ६३ कोटी ७१ लाख ८० हजार पाचशे रुपये मंजूर अनुदान आतापर्यंत ६७ हजार ४७१ शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. पैकी उर्वरित १६ हजार शेतकऱ्यांना आठ कोटी ४७ लाख ५७ हजार ६९३ रुपयांची प्रतीक्षा आहे. 


प्राथमिक सर्वेक्षणाच्या आधारे सादर केलेली मागणी प्रत्यक्षात तलाठ्यांकडून प्राप्त झालेल्या पंचनाम्यानुसार तयार केलेल्या अंतिम आकडेवारीत बदल आहे. प्राप्त अनुदान धुळे तहसील कार्यालयाने आयसीआयसीआय बॅंकेत नेप्टद्वारे वर्ग केले. या बॅंकेने डीडीसी, एसबीआयसह इतर बॅंकाकडे वर्ग केले आहेत. हे अनुदान तालुक्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. बहुतांश शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील बहुतांश शेतकरी धुळे तहसील कार्यालयात खेटे घालत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नाही. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याला तांत्रिक अडचणीचे ग्रहण लागले आहे. 

पैसे खात्यावर वर्ग न होण्याचे कारण 
बॅंक चुकीचे खाते क्रमांक, चुकीचे आधार क्रमांक, शेतकरी मृत, इतर हक्क, वैगरे नावे आदी दिशाभूल करणारे कारणे आहेत. गावस्तरावर शेतकऱ्यांकडून माहिती घेताना तलाठींनी काळजी घेणे अपेक्षित होते. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांचे चुकीचे आधार क्रमांक एक्सेल शीटला नोंद केले आहे. तेच एक्सेल शीट पुढे तालुक्याला पाठवले. धुळे तहसील कार्यालयाने या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. नुकसानभरपाई प्रतिहेक्टरी आठ हजार रुपये, बहुवार्षिक (फळबागा)ला १८ हजार रुपये मदत आहे. 

नैसर्गिक आपत्तीअंतर्गत उर्वरित बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. अनुदान प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल. 
-किशोर कदम, तहसीलदार, धुळे ग्रामीण 

अतिवृष्टी अनुदान काही शेतकऱ्यांना मिळाले. अद्याप ३७० शेतकरी वंचित आहेत. धुळे तहसील कार्यालयात वेळोवेळी भेट देत आहे. मात्र, अनुदान अद्याप जमा झालेले नाही. 
-त्र्यंबक पाटील, 
शेतकरी, भदाणे (ता. धुळे) 

नैसर्गिक आपत्ती निधीची स्‍थिती 
* धुळे ग्रामीण : बाधित शेतकरी संख्या - ८३ हजार ४७१ 
* बाधित क्षेत्र : ९५ हजार १७७ 
* आवश्‍यक निधी ः ७६ कोटी १५ लाख ४३ हजार ९९३ 
* अनुदान वाटप शेतकरीसंख्या : ६७ हजार ४७१ 
* अनुदान वाटप रक्कम : ६३ कोटी ७१ लाख ८० हजार ५०० 
* शिल्लक शेतकरी संख्या : १६ हजार 
* आवश्यक निधी : आठ कोटी ४७ लाख ५७ हजार ६९३ 
 
संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com