esakal | भाजीपाला विक्रेत्यांनो, करा ग्रा. पं.समोर व्यवसाय 
sakal

बोलून बातमी शोधा

songir gram panchayat

लोकसंख्यावाढीनुसार गावविकासासाठी विशेषतः व्यवसायवृद्धीसाठी जागा नाही. नाशिक, पुण्याच्या किमतीएवढे दर असल्याने बाजारपेठेत दुकान घेणे केवळ अशक्य आहे. सर्वसामान्य व्यावसायिकांना हातगाड्यांवर व्यवसाय करणे भाग आहे.

भाजीपाला विक्रेत्यांनो, करा ग्रा. पं.समोर व्यवसाय 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनगीर (धुळे) ः येथील दैनंदिन बाजारपेठेतील भाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढून त्यांना येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत हातगाड्या लावण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे; तर आठवडे बाजारही केवळ ग्रामपंचायत व रथचौकातच भरेल, अशी व्यवस्था केली. हातगाड्यांचे गावातील अतिक्रमण काढण्यात आल्याने बाजार चौक, अकबर चौक व माळी समाज मंगल कार्यालय परिसराने २५ वर्षांनंतर प्रथमच मोकळा श्‍वास घेतला. त्यामुळे गावातील रहदारी सुरळीत होण्यास मदत होईल. दरम्यान, ग्रामपंचायतीने कायम बंद टपऱ्यांचे अतिक्रमण काढून त्यापैकी काही ठिकाणी व्यापारी संकुल बांधकाम सुरू केले आहे. 
लोकसंख्यावाढीनुसार गावविकासासाठी विशेषतः व्यवसायवृद्धीसाठी जागा नाही. नाशिक, पुण्याच्या किमतीएवढे दर असल्याने बाजारपेठेत दुकान घेणे केवळ अशक्य आहे. सर्वसामान्य व्यावसायिकांना हातगाड्यांवर व्यवसाय करणे भाग आहे. गावाच्या मध्यवर्ती भागात बाजारपेठ असल्याने येथे व्यवसाय अधिक होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हातगाड्या लावल्या जातात. परंतु त्यामुळे पायी चालणे तसेच दुचाकी वाहनांना जाण्यास जागाच राहत नाही. हातगाड्यांचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी अनेकदा झाली. 
अनेकदा हातगाड्या हटविल्या. मात्र पर्यायी व्यवस्था नसल्याने पुन्हा त्याच जागी हातगाड्या लागल्या. आता ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांनी ग्रामपंचायतीसमोर व आठवडे बाजार तसेच पूर्वीच्या भाजीपाला मार्केटसमोरील जागा हातगाड्या लावण्यासाठी दिल्याने भाजीपाला विक्रेत्यांनी सध्या हातगाड्या लावल्या असल्या, तरी ते किती दिवस तेथे व्यवसाय करतील याची खात्री देता येत नाही. कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे. 

दुकानांचे अतिक्रमण काढा 
बाजारपेठेतील दुकानचालकांनी दुकानाचे बांधकाम करताना जागा थोडी वाढवून अतिक्रमण केले आहे. पूर्वी बाजारपेठेतून ट्रक जात असे. आता मोटारसायकलही जाऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. ग्राहकांच्या उभ्या सायकल व मोटारसायकलींमुळे पादचाऱ्यांना अडचणीतून वाट काढणे कठीण जाते. या पार्श्‍वभूमीवर दुकानांचे वाढीव अतिक्रमण काढून कायमस्वरूपी बाजारपेठ मोकळी करावी, अशी मागणी आहे.