esakal | विद्यार्थी जात होते शिक्षणापासून दूर; शिक्षकांनी वळविले पालकांचे मन
sakal

बोलून बातमी शोधा

student migration

शिक्षकांनी तांड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोना काळात आपल्या मुलांना घेऊन जाऊ नका म्हणून समजूत घातली व काळजी घेण्याचे आवाहन केले. 

विद्यार्थी जात होते शिक्षणापासून दूर; शिक्षकांनी वळविले पालकांचे मन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देऊर (धुळे) : अंचाडेतांडा (ता. धुळे) येथे ऊस तोडीसाठी स्थलांतर होणाऱ्या पालकांच्या घरी भेट देऊन आपल्या पाल्यांना ऊसतोडी ठिकाणी नेऊ नये म्हणून सर्व शिक्षकांनी पालकांचे मन वळविण्याचा प्रयत्न करून यश मिळविले. 
ऊस तोडणीसाठी जाणारे कुटुंब आपल्या मुलांना मदतीसाठी सोबत नेतात. मात्र, त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे कुठेतरी थांबायला हवे, यासाठी येथील शिक्षकांनी तांड्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना कोरोना काळात आपल्या मुलांना घेऊन जाऊ नका म्हणून समजूत घातली व काळजी घेण्याचे आवाहन केले. 

यंदा केवळ गृहभेटी
विद्यार्थी स्थलांतर रोखण्यासाठी दर वर्षी प्रेरणा सभा घेतली जाते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहभेट घेण्यात आली. प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, शिक्षण विस्ताराधिकारी श्रीमती एस. एस. भामरे, केंद्रप्रमुख चंद्रकांत शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. भेटीत शिक्षकांनी ‘आपले कुटुंब-आपली जबाबदारी’ अभियानाची माहिती दिली. मास्कचा वापर करा, विनाकारण गर्दी करू नका, बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवा, अशा सूचना केल्या. ‘जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही’, हा पंतप्रधानांचा संदेश मुलांना दिला. बालरक्षक तथा मुख्याध्यापिका अरुणा पवार, संजय ठाकूर, श्रीकांत मोरे, भूमिका पाटील, राजेंद्र पाटील वेळोवेळी पालकांशी समन्वय साधत आहेत.