esakal | सुरत वरून पळून आल्या; फसवणूक झाली, मात्र पोलिसांमूळे दोघी पालकांकडे सुखरूप 
sakal

बोलून बातमी शोधा

सुरत वरून पळून आल्या; फसवणूक झाली, मात्र पोलिसांमूळे दोघी पालकांकडे सुखरूप 

सुरत येथील कोरली गावातील १४ वर्षीय मुलीची परिसरातील तरुणासोबत मैत्री होती. नंतर ते प्रेमात पडले. तिला तरुणाने लग्नाचे स्वप्न दाखविले.

सुरत वरून पळून आल्या; फसवणूक झाली, मात्र पोलिसांमूळे दोघी पालकांकडे सुखरूप 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : लग्नाच्या उद्देशाने सुरत (गुजरात) येथून पळून धुळे शहरात दाखल झालेल्या दोन बालिकांना शहर पोलिसांनी संबंधित पालकांच्या स्वाधीन केले. दोन्ही बालिका रविवारी (ता. ६) रात्री शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील एका आडोशाल्या बसलेल्या पोलिसांना दिसल्या. त्यांची चौकशी करत शहर पोलिस ठाण्यात आणले. रात्रभर त्यांना पोलिस ठाण्यात थांबवून सकाळी पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन्ही मुली सुखरूप असल्याने समाधानी पालकांनी पोलिसांचे आभार मानले. 

आवश्य वाचा- Bharat Band Updates : कृषी विधेयकाविरोधात जळगाव शहरात बंदला प्रतिसाद -
 

सुरत येथील कोरली गावातील १४ वर्षीय मुलीची परिसरातील तरुणासोबत मैत्री होती. नंतर ते प्रेमात पडले. तिला तरुणाने लग्नाचे स्वप्न दाखविले. त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले. तारीख ठरली. मुलीने पळून जाण्याची तयारी केली. रविवारी (ता. ६) सकाळी मुलीचे आई- वडील कामाला गेले. घरी कुणीही नसल्याची संधी साधत तिने मामाच्या १२ वर्षीय मुलीला सोबत घेत सुरत बसस्थानक गाठले. त्या धुळे एसटी बसमध्ये बसल्या. मात्र, ऐनवेळी सोबत येण्यास त्या तरुणाने नकार दिला. नंतर त्या दोन मुली बसने धुळे येथे पोचल्या. त्यांना रात्र झाली. त्यांच्याकडे परतण्यासाठी तिकिटाचे पैसे नव्हते. घरी जावे कसे, असा प्रश्न त्यांना पडला. विवंचनेतील पीडित मुली येथील बसस्थानकात आडोशाला बसल्या. 
 
पालकांना अश्रू अनावर 
रविवारी रात्री नऊच्या सुमारास बसस्थानकात पोलिस नाईक बालमुकुंद दुसाणे आणि हवालदार रणजित वळवी यांना चिंताग्रस्त दोन मुली दिसल्या. त्यांनी दोघांची विचारपूस केली. नंतर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांना माहिती दिली. त्यांनी बसस्थानकात दोन मुलींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांना शहर पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. चौकशीवेळी मुलींनी आपबिती सांगितली. पोलिसांनी संबंधित पालकांना कळविले. तोपर्यंत मुलींना रात्री पोलिस ठाण्यात आसरा दिला. पालक सोमवारी सकाळी येथे दाखल झाले. मुलींना सुखरूप पाहून पालकांना आनंद झाला, तसेच अश्रू अनावर झाले. पोलिसांनी पालकांना मुलींना रागावू नका, त्यांना समजावून सांगा, असे सांगितले. शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचे पालकांनी आभार मानले. तत्पूर्वी, पालकांनी मुली घरी नसल्याने सुरत येथील गंगाधरा पोलिसांना माहिती दिली होती. 


संपादन- भूषण श्रीखंडे

loading image