esakal | धुळे जिल्ह्यातील ३७ हजार महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मिळाला लाभ !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यातील ३७ हजार महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मिळाला लाभ !

राज्यातील प्रथमतः गर्भवती महिला व स्तनदामाता, ज्यांची गर्भधारणा १ जानेवारी २०१७ ला अथवा तद्‌नंतर झाली असेल, अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ पहिल्या जीवित अपत्यासाठी दिला जात आहे.

धुळे जिल्ह्यातील ३७ हजार महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा मिळाला लाभ !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा जिल्ह्यातील ३६ हजार ९६५ पात्र महिलांना लाभ झाला असून, १५ कोटी ४८ लाख ३३ हजारांचे अनुदान वितरित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली. 

दारिद्र्यषेखालील व दारिद्र्यरेषेवरील अनेक महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत काम करावे लागते. त्यामुळे अशा माता कुपोषित राहतात. त्यामुळे त्यांच्या नवजात शिशूच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. माता व बालकांचे आरोग्य सुदृढ होण्यासाठी, गर्भवती व स्तनदामातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांचे व नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे, माता व बालमृत्यूच्या दरात घट होऊन नियंत्रणासाठी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना देशात १ जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित केली आहे. 

राज्यातील प्रथमतः गर्भवती महिला व स्तनदामाता, ज्यांची गर्भधारणा १ जानेवारी २०१७ ला अथवा तद्‌नंतर झाली असेल, अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ पहिल्या जीवित अपत्यासाठी दिला जात आहे. या योजनेंतर्गत तीन टप्प्यांमध्ये पाच हजारांचे अनुदान दिले जाते. पहिल्या हप्त्यासाठी संबंधित लाभार्थ्याला मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजीपासून गोवर रुबेलापर्यंतचे संपूर्ण लसीकरण व त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यांनतर लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात लाभ जमा केला जातो. 

या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र महिलांना ऑनलाइन निधी वितरित झाला आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तालुका व शहरी भागातील आरोग्य संस्थानिहाय संबंधित तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका समूह संघटक, आशा कर्मचाऱ्यांना सूचना दिली आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र प्रथम खेपेच्या गर्भवती मातांनी आरोग्य विभागातील आशा कर्मचाऱ्यांकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., महापालिका आयुक्त अजीज शेख, जिल्हा परिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे यांनी केले आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे