चिंताजनक : धुळ्यात दोघा महिलांसह व्यापारी पॉझिटिव्ह; "कोरोना'चे 31 बाधित

निखिल सूर्यवंशी
रविवार, 3 मे 2020

धुळे महापालिका हद्दीत सात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर झाले आहेत. ते प्रशासनाने "सील' केले आहेत. शिवाय काही अटीशर्तींसह दुपारी दोननंतर शहरात संचारबंदी आणि पूर्णत ः "लॉक डाऊन'ण्याचा आदेश लागू आहे.

धुळे : शहराला संसर्गजन्य "कोरोना व्हायरस' विळखा घालत आहे. या आजाराचे रात्री नऊनंतर आणखी तीन पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. त्यामुळे शहरातील रूग्ण संख्या 23 झाली असून साक्रीतील चार, शिरपूर व शिंदखेडा तालुक्‍यातील प्रत्येकी दोन रूग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 31 वर पोहोचला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
 

आई, आजीही बाधित
शहरातील आझादनगर क्षेत्रातील गरीब नवाज नगरमधील पूर्वीच कोरोना बाधीत तरूणाची 40 वर्षीय आई आणि 83 वर्षीय आजीला "कोरोना'ची लागण झाली आहे. तसा अहवाल सर्वोपचार रूग्णालयाकडून आज रात्री प्राप्त झाला. यापाठोपाठ ह्रदयावर बासपास शस्त्रक्रियेसाठी 27 ला नाशिक येथे एका खासगी रूग्णालयात रवाना झालेल्या गल्ली क्रमांक सहाच्या परिसरातील 65 वर्षीय कापड व्यावसायिकाला नाशिक येथे "कोरोना'ची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा 31 वर पोहोचला. पैकी आतापर्यंत एकूण धुळे शहरात सर्वाधिक 23, साक्रीतील चार, शिंदखेडा व शिरपूर तालुक्‍यात प्रत्येकी दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातही धुळे शहरातील चौघांचा, तर साक्रीतील दोघांचा मृत्यू झाला आहे. तत्पूर्वी, "कोरोना'चे जिल्ह्यात 28 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.

दोघांची प्रकृती अत्यवस्थ
शहरालगत भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात आज सायंकाळी सहापर्यंत 182 व्यक्तींचे थर्मल स्कॅनिंग झाले. त्यात 19 जणांना रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी घेतले. कोरोना टेस्ट लॅबकडे 37 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहेत. पॉझिटिव्ह 19 रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. त्यांची प्रकृती स्थिर, तर दोघा रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले. दरम्यान, सर्वोपचार रुग्णालयातील लॅबकडून धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील रुग्णांचे नमुने तपासले जात होते. मात्र, मालेगाव येथील नमुन्यांची तपासणी आता नाशिक येथे होत असल्याने येथे काही दिवसांत तपासणीच्या नमुन्यांमध्ये घट होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule two positive case again corona virus