भाऊबीजला भावाची बहिणीसाठी अनोखी भेट; सतराव्यांदा रक्‍तदान

जगन्नाथ पाटील | Friday, 20 November 2020

प्रत्येक भाऊबीजला कुणालाही न कळविता; थेट रक्तपेढीत जावून रक्तदान करणारा हा युवक वेगळाच आहे. बहिण आणि भावाचे नाते अतुलनीय आहे. भाऊबीजला बहिणीला विशेष भेट दिली जाते.

कापडणे (धुळे) : जगात ध्येयवेड्या माणसांची कमी नाही. कुणालाही न समजू देता त्यांचे विधायक काम अविरत सुरु ठेवतात. उडाणे येथील एका ध्येयवेड्या तरुणाने दोन– चार वेळा नव्हे; तर तब्बल सोळा वेळा रक्तदान केले आहे. अन्‌ आता भाऊबीजला सतराव्यांदा रक्तदान केले. महिलांना अर्थात बहिणीं प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाऊबीजला रक्तदान करणारा हा अवलिया आहे देवेंद्र पाटील.

उडाणे (ता.धुळे) येथील देवेंद्र पाटील हे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात पुढे असतात. दरम्यान पाटील हे धुळे शहरातील शाळांना देशभक्तांचे फोटोही भेट देतात. खास करून माजी राष्र्टपती अब्दुल कलाम यांची फोटो फ्रेम भेट देतात. सध्या मेहनती शिक्षकांना दिवाळीची मिठाईची भेट देत आहेत.

इतर बहिणींशी आपुलकीने दान
उडाणे (ता.धुळे) येथील देवेंद्र पाटील यांचे सतरा वेळा रक्तदान करुन झाले. प्रत्येक भाऊबीजला कुणालाही न कळविता; थेट रक्तपेढीत जावून रक्तदान करणारा हा युवक वेगळाच आहे. बहिण आणि भावाचे नाते अतुलनीय आहे. भाऊबीजला बहिणीला विशेष भेट दिली जाते. मात्र इतर बहिणींशी आपुलकीचे आणि रक्तदानाचे नाते प्रस्तावीत करण्यासाठी ते रक्तदान करतात. विशेष म्हणजे आग्रहाने रक्तपेढीतील डॉक्टरांना गरजू महिलेसच माझे रक्त पुरविण्याचे पाटील आग्रहाने सांगतात.

Advertising
Advertising

वृध्दाश्रमाला देतात दरवर्षी दोन पोती धान्य
देवेंद्र पाटील हे दरवर्षी सुगी संपली म्हणजे अन्नधान्य घरात भरतात. त्याचवेळी दोन पोती धान्य वध्दाश्रमासाठी काढून ठेवतात. अन तात्काळ पोहचवितात. हा उपक्रम नित्य नियमाने पाळत आले आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे