कॉंग्रेसमध्ये नाराजीचे वारे; "राष्ट्रवादी'वर खापर! 

कॉंग्रेसमध्ये नाराजीचे वारे; "राष्ट्रवादी'वर खापर! 

धुळे ः निवडणुकीत साक्री, शिरपूर, धुळे शहर विधानसभा मतदारसंघात उमेदवार निश्‍चिती, जागा वाटपावरून भाजपमध्ये नाराजीचा सूर असताना याच मुद्यावरून कॉंग्रेसमध्येही नाराजीचे वारे वाहत आहेत. यात कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसवर गोंधळाचे खापर फोडले आहे. कॉंग्रेसचे उमेदवार देता येणे शक्‍य असतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेसने शिंदखेडा व धुळे शहर मतदारसंघात अकारण घोळ निर्माण केल्याचा आरोप कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. 

कॉंग्रेस आघाडीकडून शिंदखेडा व धुळे शहर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला, तर साक्री, शिरपूर, धुळे ग्रामीण मतदारसंघ कॉंग्रेसला सोडण्यात आला आहे. शिंदखेडा मतदारसंघात कॉंग्रेसतर्फे जागा मागणीचा आग्रह होता. या मतदारसंघातील प्रस्थापित भाजपला कॉंग्रेसचा उमेदवारच चांगला शह देऊ शकतो, असा दावा झाला. मात्र, तो फेटाळून लावत या मतदारसंघातील जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्वतःकडे ठेवली. त्यावरून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे, तर कॉंग्रेसमधूनही असंतोष व्यक्त केला जात आहे. तीच स्थिती धुळे शहर मतदारसंघात दिसून येते. 

"राष्ट्रवादी'चा उमेदवारच नाही 
धुळे शहर मतदारसंघात जागा मिळूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारच दिला नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज अंतिम मुदत असूनही शेवटच्या क्षणापर्यंत ना "एबी फॉर्म' कुणाला मिळाला ना त्यामुळे कॉंग्रेसला उमेदवार देता आला. यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत कॉंग्रेसचे शहर- जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ यांनी सांगितले, की निवडणूकपूर्व मुंबईतील बैठकीत धुळे शहराची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडण्यात आल्याची माहिती दिली देली. तसेच आघाडीतील "राष्ट्रवादी'च्या उमेदवाराला कॉंग्रेसने मदत करावी, अशी सूचना झाली. त्यास श्री. करनकाळ व उपस्थित मान्यवरांनी होकार दिला. प्रत्यक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आज संपुष्टात येईपर्यंत उमेदवार कोण आणि "एबी फॉर्म' कुणाला दिला याविषयी कुठलीही माहिती दिली नाही. याबाबत कॉंग्रेसच्या वरिष्ठ स्तरावर विचारणा केली असता "आम्हालाही काहीच माहिती नाही आणि "राष्ट्रवादी'ने कुणाला उमेदवारी, "एबी फॉर्म' दिला याविषयी काहीही सांगण्यात आले नाही, असे घडले कसे', अशी उलट भूमिका मांडण्यात आली. हा घोळ निर्माण होण्यापूर्वी हालचाली झाल्या असत्या, "राष्ट्रवादी' उमेदवार देण्यास असमर्थ असल्याचे वेळीच समजले असते तर कॉंग्रेसला जागा सोडवून घेता आली असती. या पक्षाकडे चांगले उमेदवार होते. यातून कॉंग्रेस पक्ष धुळे शहरात वाढू द्यायचा नाही का, असा प्रश्‍न अनेकांच्या मनात येत आहे. याविषयी खंत असून ती पत्राव्दारे वरिष्ठांना कळविणार असल्याचे श्री. करनकाळ यांनी नमूद केले. 

सनेरांचे "राष्ट्रवादी'वर खापर 
शिंदखेड्यातील जागा व उमेदवारीसंदर्भात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर यांनी पत्रकाव्दारे सांगितले, की जनभावनेचा आदर राखत, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष उमेदवारी न करण्याचा निर्णय आज घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माझ्यावर सातत्याने अन्याय केला जात आहे. मतदारसंघात 2009 मध्ये कॉंग्रेस- "राष्ट्रवादी'ची आघाडी असतानाही "राष्ट्रवादी'च्या उमेदवाराने बंडखोरी करून अप्रत्यक्षपणे भाजपला मदतच केली. त्यावेळीही माझ्यावर अन्याय झाला. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार न देता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांना कॉंग्रेसने पाठिंबा द्यावा आणि त्या बदल्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदखेडा मतदारसंघ कॉंग्रेसला सोडावा, असे त्यावेळी एकमताने आघाडीत ठरले होते. तरीही या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जागा न सोडण्याची आडमुठेपणाची भूमिका "राष्ट्रवादी'ने घेतली. त्यामुळे व्यथित झालो आहे. परिणामी, शिंदखेडा मतदारसंघातील पंधरा वर्षांतील मेहनतीवर पाणी फिरवण्याचे काम केले आहे. माझ्या अपक्ष उमेदवारीमुळे भाजपला फायदा होऊ नये म्हणून अपक्ष उमेदवारी न करण्याचे ठरविले असून यापुढे कॉंग्रेसशी निष्ठा राखून जनसेवेत कार्यरत राहील, असे सनेर यांनी नमूद केले. या स्थितीत स्थानिक कॉंग्रेसकडून मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बेडसे यांना पाठबळ दिले जाते किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष असेल. 
 
"राष्ट्रवादी'मध्ये कमालीची खदखद 
धुळे शहर मतदारसंघात शक्‍य असून उमेदवार न दिल्याने "राष्ट्रवादी'च्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा असंतोष, खदखद निर्माण झाली आहे. उमेदवारीसाठी रणजितराजे भोसले यांच्यासह काही इच्छुक तयारीला लागले होते. समाजवादी पक्षाने या पक्षाची शहरातील जागा मागितली होती. परंतु, "राष्ट्रवादी'कडून नेमकी काय भूमिका घेतली गेली हे अद्याप पडद्याआड असल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com