विधानसभा निवडणुकीत युती धर्म पाळा ः महाजन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

धुळे ः विधानसभा निवडणुकीत धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघाची जागा शिवसेनेला जाणार असल्याचे दाट संकेत आहेत. या जागा भाजपलाच मिळतील, अशी स्थानिक नेते, पदाधिकारी, इच्छुकांना अपेक्षा होती. या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यानंतर आज मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यावेळी "युती धर्म पाळा', असा उपदेशच मंत्री महाजन यांनी शिष्टमंडळाला केला. 

धुळे ः विधानसभा निवडणुकीत धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघाची जागा शिवसेनेला जाणार असल्याचे दाट संकेत आहेत. या जागा भाजपलाच मिळतील, अशी स्थानिक नेते, पदाधिकारी, इच्छुकांना अपेक्षा होती. या संदर्भात भाजपच्या शिष्टमंडळाने पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यानंतर आज मुंबईत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यावेळी "युती धर्म पाळा', असा उपदेशच मंत्री महाजन यांनी शिष्टमंडळाला केला. 
धुळे शहर व धुळे ग्रामीणची जागा शिवसेनेकडे जात असल्याच्या मुद्यावरून मित्रपक्ष भाजपच्या येथील गोटात नाराजीचे चित्र आहे. भाजपलाच जागा मिळेल, असे मानून सहा इच्छुक दोन महिन्यांपासून कामाला लागले होते. यात कार्यकर्तृत्वाच्या बळावर शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांना शहरात उमेदवारी मिळेल, असा दृढ विश्‍वास होता. मात्र, शहराची जागा हातून निसटत असल्याचे लक्षात येताच अग्रवाल समर्थक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही जागा भाजपलाच मिळावी म्हणून काल (ता. 29) मंत्री रावल यांना साकडे घातले. नंतर अग्रवाल समर्थक शिष्टमंडळाने मुंबईत मंत्री महाजन यांची आज दुपारनंतर भेट घेत शहराची जागा मिळण्याबाबत चर्चा केली. 

महाजन यांचा उपदेश 
या संदर्भात मंत्री महाजन शिष्टमंडळाला म्हणाले, की युती व जागा वाटपाबाबतचा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतला आहे. त्यांच्यापेक्षा मी किंवा अन्य मंत्री मोठे नाहीत. धुळे शहर व धुळे ग्रामीणची जागा कुणाला जाईल, काय घडेल, उमेदवार कोण असेल यावर चर्चा करण्यापेक्षा आपल्या पक्षासह युतीचा जो निर्णय होईल, त्याप्रमाणे युती धर्म पाळावा. निवडणुकीत आपण काय करणार आहोत ते आधी ठरविले पाहिजे. आम्हालाही जागा आपल्याकडेच राहाव्यात असे वाटते. एक- एक जागेला सत्तेसाठी महत्त्व आहे. परंतु, जागेबाबत "हायकमांड'शी आम्ही वाद घालू शकत नाही. त्यामुळे स्थिती लक्षात घेऊन पक्षाच्या निर्णयाप्रमाणे युती धर्म पाळण्यावर कटाक्ष ठेवावा, असे मंत्री महाजन यांनी सांगितले. शिष्टमंडळात भाजपच्या येथील उपमहापौर कल्याणी अंपळकर, माजी शहराध्यक्ष हिरामण गवळी, नगरसेवक नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी, शीतल नवले, सुनील बैसाणे, भिकन वराडे यांच्यासह अन्य नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश होता. चर्चेवेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, डॉ. माधुरी बोरसे उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule vidhansabha mahajan yuti