esakal | सासरी वाद झाल्‍याने महिला निघाली होती मुलीकडे; पण रस्‍त्‍यातच झाला तिचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

नंदाणे (ता.धुळे) येथील फिर्यादी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगा रवी सुकदेव होलार ह्याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची आई संगीताबाई सुकदेव होलार (वय ४०) ह्यांचे त्यांच्या सासू-सासऱ्यांशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते.

सासरी वाद झाल्‍याने महिला निघाली होती मुलीकडे; पण रस्‍त्‍यातच झाला तिचा खून

sakal_logo
By
भगवान जगदाळे

निजामपूर (धुळे) : नंदाणे (ता.धुळे) येथील एका चाळीस वर्षीय महिलेचा माळमाथा परिसरातील कढरे (ता. साक्री) गावाजवळील जंगल परिसरात एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने गळफास लावून खून केला असून आरोपी फरार आहे. महिलेच्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून आज (ता.19) निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

नंदाणे (ता.धुळे) येथील फिर्यादी तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगा रवी सुकदेव होलार ह्याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याची आई संगीताबाई सुकदेव होलार (वय ४०) ह्यांचे त्यांच्या सासू-सासऱ्यांशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याचा राग आल्याने मयत संगीताबाई ह्या सकाळी दहालाच त्यांचा लहान मुलगा रविसोबत नवागाव (ता.साक्री) येथे मुलीकडे लामकानीमार्गे पायीच निघाल्या होत्या. दरम्यान लामकानीच्या पुढे रस्त्यात एके ठिकाणी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका इसमाकडे जेवण घेतले व तेथून पुन्हा पायीच पुढचा प्रवास सुरू केला.

मागून मोटारसायकलस्‍वार आला आणि
पुढे पायी जात असताना पाठीमागून एक अज्ञात मोटारसायकलस्वार आला. त्याने त्यांना कुठे निघालेत अशी विचारपूस केली. संबंधितांनी निजामपूरला जातोय असे सांगितले. त्यानंतर त्याने मोटारसायकलने सोडून देतो असे सांगून मोटारसायकलवर बसविले. तेथून पुढे बैलगाडीवर खत टाकून पुढे जाऊ असे सांगून त्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला आमोदे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने गाडी वळवली. मुलाला खताची गोणी टाकायचे कारण सांगून रस्त्यात उतरवून दिले व संबंधित महिलेस पुढे दाट जंगलाच्या दिशेने घेऊन गेला. 

एकटाच परतला
बऱ्याच वेळानंतर संशयित मोटारसायकलस्वार तिकडून एकटाच परतला. मुलाने विचारणा केली असता त्यालाही जीवे ठार मारण्याची धमकी देऊन शर्टच्या साहाय्याने गळफास देण्याचा प्रयत्न केला व मुलाला रस्त्याच्या कडेला झाडाझुडपांमध्ये ढकलून दिले. दरम्यान संबंधित मुलगा बेशुद्ध झाला. काही वेळानंतर मेंढ्यांनी त्याला चाटल्याने तो शुद्धीवर आला. मेंढपाळांनी त्याची विचारपूस करत त्याला आमोदे गावात घेऊन गेले. तेथील काहींनी त्याला ओळखले. दरम्यान मुलाचे वडील त्याला तेथे घेण्यास आले. मुलाने घडलेली हकीकत वडील, आजोबा व इतर नातलगांना सांगितली. आज सकाळी (ता.19) पाचलाच मयत महिलेचा पती व सासरा घटनास्थळी गेले असता जंगलातील एका झाडाच्या पाठीमागे महिलेचा मृतदेह आढळून आला. संशयिताने सदर महिलेस साडीच्या पदराने गळफास दिल्याचे आढळून आले. मयत महिलेची मुलगीही नातेवाईकांसह तेथे दाखल झाली. 

संपादन ः राजेश सोनवणे