धुळे जिल्हा परिषद सभापती निवडीकडे लक्ष 

Dhule zilha parishad
Dhule zilha parishad

धुळे : अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. येत्या पंधरा दिवसांच्या आत या पदांसाठी निवड प्रक्रिया राबविली जाईल. बहुमताने भाजपची सत्ता स्थापन झाल्याने बापू खलाणे, मंगला पाटील, मोगरा पाडवी यांना सभापतिपदाची संधी असून, धुळे तालुक्‍यातील प्रा. अरविंद जाधव, धरती देवरे, राम भदाणे यांच्यातही चुरस असेल. 
जिल्हा परिषदेत चार विषय समित्यांसाठी निवड प्रक्रिया राबविली जाईल. त्यात समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन, महिला व बालविकास समिती सभापतींची निवड केली जाईल. समाजकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी शिरपूर तालुक्‍यातील मोगरा जयवंत पाडवी, कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदासाठी धुळे तालुक्‍यातील बापू खलाणे, महिला व बालकल्याण समितीसाठी साक्री तालुक्‍यातील मंगला पाटील यांना संधी मिळू शकते. शिक्षण व आरोग्य समिती सभापतिपदासाठी धुळे तालुक्‍यातील प्रा. जाधव, सौ. देवरे, श्री. भदाणे यांच्यात चुरस दिसू शकेल. तसेच भाजपचे नेते समाजकल्याण समिती वगळता इतर समित्यांवरील सभापती निवडीच्या नावांमध्ये ऐनवेळी अदलाबदल करू शकतात. 
शिरपूर तालुक्‍याला अध्यक्षपद, शिंदखेडा तालुक्‍याला उपाध्यक्षपद बहाल झाले आहे. त्यामुळे धुळे तालुक्‍याला दोन, तर साक्री व शिरपूर तालुक्‍याला प्रत्येकी एक सभापतिपद दिले जाणार आहे. शिरपूर तालुक्‍यातून अनुसूचित जाती, जमातीचे सर्वाधिक दहा सदस्य निवडून आल्याने या तालुक्‍याला समाजकल्याण समितीचे सभापती पद दिले जावे, अशी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून सूचना आहे. अध्यक्षपद मिळावे म्हणून भाजपच्या स्थानिक व वरिष्ठ सर्व प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी करून आलेले श्री. खलाणे यांना कृषी व पशुसंवर्धन सभापतिपद दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय मंगला पाटील यांना महिला व बालकल्याण समिती सभापतिपद दिले जाईल. उर्वरित शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदासाठी धुळे तालुक्‍यातील तीन सदस्यांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्‍यता असेल. भाजपचे नेते नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. 
 
निकम यांच्याकडे अर्थ व बांधकाम समिती 
जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कुसुमताई कामराज निकम यांच्याकडे अर्थ, नियोजन व बांधकाम समितीचे सभापतिपद राहणार असल्याचे रावल गटाकडून सांगण्यात आले. त्याविषयी भाजपचे निवडणूक प्रभारी तथा आमदार जयकुमार रावल, अमरिशभाई पटेल, डॉ. सुभाष भामरे यांच्यात एकमत झाल्याचेही रावल गटाने सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com