शिक्षकांचे सेवापुस्तक  पडताळणीच्या चक्रव्यूहात   

तुषार देवरे
Tuesday, 9 June 2020

वरिष्ठ वेतनश्रेणीत जे शिक्षक पात्र ठरले आहेत. तेच शिक्षक अंशदायी पेन्शनमध्ये येतात. या शिक्षकांना 
शासननिर्णयानुसार "डीसीपीएस'चा पहिला हप्ता मिळणे आवश्‍यक होता. मात्र तोही मिळालेला नाही.

देऊर (ता. धुळे) ः जिल्हा परिषदेच्या 173 प्राथमिक शाळा शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू होऊन पाच महिने लोटले मात्र, यातील 110 शिक्षकांचे सेवापुस्तक पडताळणीच्या चक्रव्यूहातून अद्याप बाहेर पडलेले नाही. त्यांच्या सेवापुस्तकांची पडताळणी कोण करणार असा प्रश्‍न आहे.

"कोरोना'च्या धाकातही "शिक्षक'उतरले रस्त्यावर  

जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील 173 शिक्षकांना 27 जानेवारी 2020 ला बारा वर्षांची अहर्ताकारी सेवेनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी. यांच्या आदेशाने वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर झाली. शिंदखेडा तालुक्‍यातील 63 शिक्षकवगळता धुळे, साक्री, शिरपूर तालुक्‍यातील 110 शिक्षकांचे सेवापुस्तक अद्यापही पडताळणीच्या चक्रव्यूहात अडकले आहे. 

काम कुठे अडले? 
धुळे तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाने वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर पात्र 30 प्राथमिक शिक्षकांचे मूळ सेवापुस्तक पडताळणीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठविले. मात्र "सरकारी काम सहा महिने थांब' याचा प्रत्यय येथे आला. स्वतः शिक्षक वेळोवेळी जाऊन तपास करीत होते. तेच पुस्तके पुन्हा पडताळणी न करता एक पत्र देऊन माघारी पंचायत समिती शिक्षण विभागात पाठविले. याबाबत पंचायत समितीत पडताळणी करणारा विभागही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे सेवापुस्तक पडताळणी कोण करणार? असा प्रश्न ऐरणीवर आला. 22 ऑक्‍टोबर 2017 अखेर व 23 ऑक्‍टोबर 2017 नंतर असे दोन टप्प्यांत वरिष्ठ वेतनश्रेणी मंजुरी दिली आहे. तीच स्थिती शिरपूर तालुक्‍यातील 55, तर साक्रीच्या 25 शिक्षकांची आहे. दरम्यान, सेवापुस्तक पडताळणी न करता सुधारित वेतनश्रेणी लागू केले व वेतन कमी जास्त झाले, तर नंतरची "रिकव्हरी' कोण करणार? असा प्रश्‍न शिक्षण विभागाने उपस्थित केला. 

"डीसीपीएस'चा हप्ता मिळावा 
वरिष्ठ वेतनश्रेणीत जे शिक्षक पात्र ठरले आहेत. तेच शिक्षक अंशदायी पेन्शनमध्ये येतात. या शिक्षकांना 
शासननिर्णयानुसार "डीसीपीएस'चा पहिला हप्ता मिळणे आवश्‍यक होता. मात्र तो मिळाला नाही. त्याबाबतची कार्यवाहीदेखील थांबल्याने शिक्षक दोन्ही महत्त्वपूर्ण लाभापासून वंचित आहेत. ही कामे लवकर व्हावीत अशी अपेक्षा संबंधित शिक्षकांना आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule zp teachers servicebook verification