#BattleForDindori युतीच्या बुरुजाला खिंडार पाडण्याची "राष्ट्रवादी'ची धडपड 

residentional photo
residentional photo

   
     दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या रचनेनंतरच्या दोन निवडणुकांत भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांनी निफाड विधानसभा मतदारसंघातून वैयक्तिक संपर्काच्या जोरावर मताधिक्‍य मिळविले होते. आता श्री. चव्हाण निवडणूक रिंगणात नसताना लोकसभेसाठी राष्ट्रवादी अन्‌ भाजपने उमेदवार बदलले आहेत. मात्र, निफाड विधानसभा मतदारसंघातील युतीच्या भक्कम बुरुजाला खिंडार पाडून राष्ट्रवादी मताधिक्‍याची संधी "कॅश' करणार काय?, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

   शिवसेना-भाजप युतीतर्फे मनोमिलन आणि संपर्क सभेच्या माध्यमातून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्यासाठी पूरक स्थिती निर्माण केली आहे. पण तरीही राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले यांनी भेटीगाठीतून "अंडर करंट' निर्माण करत शेतकऱ्यांमधील भाजपविषयक नाराजी आपल्याकडे झुकवल्यास त्याबद्दल आश्‍चर्य वाटायला नको. खरे म्हणजे, निवडून कुणाला आणायचे यापेक्षा कुणाचा पराभव करायचा याबद्दलच्या खासियतसाठी निफाडकर परिचित आहेत. लोकसभा निवडणुकीचा माहोल एव्हाना मतदारसंघात तयार झाला आहे

   डॉ. भारती पवार यांचे राष्ट्रवादीमधून पक्षांतर करण्यापासून ते त्यांच्या उमेदवारीपर्यंत निफाडचे शिवसेनेचे आमदार अनिल कदम व भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांची भूमिका निर्णायक ठरल्याची बाब लपून राहिलेली नाही. डॉ. पवार यांना उमेदवारी जाहीर होताच, आमदार कदम यांनी दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला युतीच्या स्थानिक नेत्यांच्या मनोमिलनाची बैठक घेत साखरपेरणी केली. त्यापाठोपाठ पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पिंपळगावला प्रचाराची सुरवात केली. एरवी फटकून वागणारे भाजपचे काही कार्यकर्तेही दोन्ही ठिकाणी आमदारांशी हास्यसंवादात रमले होते. मनोमिलनाच्या अंकानंतर शिवसेनेचे भास्कर बनकर, सुधीर कराड, बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह भाजपचे बापूसाहेब पाटील, लक्ष्मण निकम, संजय वाबळे आदींनी व्यूहरचनेला सुरवात केली. 

द्याल त्या उमेदवारासाठी परिश्रम 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप बनकर यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना, द्याल त्या उमेदवारासाठी परिश्रम घेण्याचे वचन दिले. त्यामुळे महालेंच्या मताधिक्‍यासाठी त्यांनी "फिल्डिंग' लावण्यास सुरवात केली आहे. त्याची झलक त्यांनी निफाडला मेळावा घेऊन दाखवली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रंगीत तालमीची संधी बनकरांपुढे आहे. त्यासाठी त्यांना मित्रपक्षांच्या नेत्यांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. "मविप्र'च्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, कॉंग्रेसचे माणिकराव बोरस्ते, राजेंद्र मोगल, दिगंबर गिते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, साहेबराव मोरे यांना सोबत घेत शक्तिप्रदर्शन घडवत हवा फिरवावी लागेल. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, सिद्धार्थ वनारसे, राजेंद्र शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांवर बनकरांची "सेमी फायनल'ची भिस्त आहे. शेतमालाच्या कोसळलेल्या भावामुळे शेतकरी संतापले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी राष्ट्रवादीसाठी फायद्याची ठरणार आहे. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघाची जबाबदारी स्वतःवर घेत पालकमंत्र्यांनी "डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न सुरू केल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी स्नेहभाव असलेल्या जैन, गुजराती व्यापाऱ्यांची "व्होट बॅंक' तोडण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना ताकद लावावी लागणार आहे. त्यातच श्री. चव्हाण उमेदवार नसल्याने निफाडमधील त्यांचे सर्वपक्षीय मित्रांची मिळणारी साथ ही महालेंसाठी "प्लस पॉइंट' ठरण्याची चिन्हे दिसताहेत. 
 

निफाडमधून मिळालेली मते 
2009 ची निवडणूक 
भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण- 54 हजार 492 मते 
राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ- 31 हजार 180 मते 

2014 ची निवडणूक 
भाजपचे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण- 1 लाख 1 हजार 618 मते 
राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार- 40 हजार 546 मते 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com