डीएनए प्रयोगशाळेमुळे वर्षभरात 430 गुन्ह्यांची उकल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

डीएनए प्रयोगशाळेमुळे वर्षभरात 430 गुन्ह्यांची उकल 
नाशिक ः येथील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेंतर्गत गेल्या वर्षभरापासून डीएनए प्रोफायलिंग प्रयोगशाळा उत्तर महाराष्ट्रात सुरू झाली. गेल्या वर्षभरात या प्रयोगशाळेत 497 प्रकरणे दाखल झाली आहेत. दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये लहान मुलांवरील होणारे अत्याचार तसेच गोवंश प्रकरणांचे प्रमाण लक्षणीय आहे. दाखल प्रकरणांपैकी 430 प्रकरणांचा निपटारा झाला असून तपास यंत्रणेला गुन्ह्यांची उकल होण्यासाठी मोठा हातभार लागतो आहे. 

दिंडोरी रोडवरील प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेंतर्गत ऑगस्ट 2017 पासून डीएनए प्रोफायलिंग प्रयोगशाळा सुरू झाली आहे. राज्यभरात 5 ठिकाणी अशा प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळेत धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील प्रकरणे दाखल होतात. दाखल प्रकरणांमध्ये साधारणपणे मातृत्व, पितृत्व तपासणी, अनोळखी मृतदेहाची ओळख पटवणे, खून, बलात्कार, चोरी, दरोडा या प्रकरणातील उपलब्ध गोष्टींच्या सहाय्याने विश्‍लेषण करून उकल केली जाते.

सिगारेटचे थोटके, ग्लास, केस, रक्ताचे नमुने, नखे, हाडे, थुंकी यासारखी नमुने दाखल होऊन त्याच्या विश्‍लेषणातून निष्कर्ष काढला जातो. अनेक प्रकरणे ही जुनी, कुजलेली, सडलेली असतात अशा वेळी त्यातून निष्कर्ष काढणे अतिशय आव्हानात्मक असते. अशा प्रकरणांची उकल करण्यासाठी प्रसंगी महिनाभराचा कालावधी लागतो. 
प्रत्येक व्यक्तीचा डीएनए प्रोफाइल हा बोटांच्या ठशांप्रमाणे वेगवेगळा असतो. प्रत्येकात अर्धा आईचा आणि अर्धा वडीलांचा डीएनए प्रोफाईल असल्याने उकल करणे सोपे जाते.

जेनेटीक ऍनालायझर, स्वयंचलित ऍक्‍स्ट्राक्‍शन मशीन, डीएनएची संख्या वाढविण्यासाठी पॉलिमरेझ चेन रिऍक्‍शन (पीसीआर), रिअल टाईम पीसीआर अशी वेगवेगळी अद्ययावत उपकरणे त्यासाठी उपलब्ध आहेत. यंत्रसामुग्री जरी अद्ययावत असली तरी काही गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा कालावधी लागतो. 

प्रयोगशाळा सुरू झाल्यापासून लहान मुलांवर होण्याऱ्या अत्याचारांची 93 प्रकरणे दाखल झाली आहेत. ऑगस्ट ते डिसेंबर 2017 या कालावधीत 58 प्रकरणे आणि जानेवारी ते जून 2018 या कालावधीत 35 प्रकरणे दाखल झाली. फक्त लहान मुलींवरच अत्याचार होतो असे नाही तर मुलांवर अत्याचार झाल्याचीही प्रकरणे दाखल होतात. तसेच गेल्या वर्षभरात 109 गोवंश प्रकरणे दाखल झाल्याने समाजात घडत असलेल्या घटनांची तीव्रता लक्षात येते. 

डीएनएन प्रोफायलिंग प्रयोगशाळेत महिन्याला साधारण 40 प्रकरणे दाखल होतात. प्रकरण दाखल झाल्यानंतर एक महिन्याच्या आत अहवाल दिला जातो. त्यामुळे तपास यंत्रणेला गुन्ह्याची उकल करण्यास फायदा होतो. पूर्वी उत्तर महाराष्ट्रातील डीएनए प्रोफायलिंगची प्रकरणे पुणे, मुंबई आणि औरंगाबादला जात होती. मात्र गेल्या वर्षभरापासून नाशिकला सुविधा उपलब्ध झाल्याने वेळेची बचत होत आहे. 
- भा. प. मोरे, उपसंचालक, प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा 

जानेवारी ते जून 2018 मध्ये दाखल झालेली प्रकरणे 
जानेवारी --------35 
फेब्रुवारी --------39 
मार्च -----------39 
एप्रिल ----------39 
मे--------------50 
जून------------57 

Web Title: marathi news dna crime