पाणीटंचाईप्रश्‍नी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी 

live photo
live photo

दोंडाईचा ः दुष्काळाचे पडसाद विखरण देवाचे (ता. शिंदखेडा) येथे उमटले. येथील भीषण पाणीटंचाई निवारणास असमर्थता दर्शविल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांना गावबंदीचा ठराव आज विशेष ग्रामसभेत मंजूर केला. सरपंच दशरथ अहिरे अध्यक्षस्थानी होते. मात्र ठरावाला माजी उपसरपंच विक्रम तायडे यांनी विरोध नोंदवला, तर ग्रामसेविका आर. एस. विसपुते यांनी ठरावाबाबत असहमती नोंदवली. 

पाणी योजनेसाठी प्रयत्न 
पाणीप्रश्नावर ग्रामस्थांनी रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे महात्मा फुले उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी आढावा बैठकीत विषय घेतला होता; परंतु जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील यांनी हस्तक्षेप करत या योजनेला विरोध केला. त्यानंतर श्री. निकम यांनी विखरणचा तीन गावे पाणीपुरवठा योजनेसाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेचा प्रस्ताव मंत्रालयस्तरावर पाठविला. मात्र त्यालाही मंजुरी मिळण्यापूर्वीच ग्रहण लागल्याने नवीन योजनेत विखरणचा समावेश करण्याबाबत हालचाली सुरू आहे. 

गावबंदीचा ठराव मंजूर 
विखरण (देवाचे) येथे सहा महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई असून, 20 ते 21 दिवसांनंतर पाणीपुरवठा होतो. या पार्श्‍वभूमीवर विशेष ग्रामसभा सरपंच अहिरे यांनी बोलविली. गावभर दवंडीद्वारे ग्रामस्थांना उपस्थितीचे आवाहन केले. विखरणच्या पाणीटंचाईकडे सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने गावात 19 नोव्हेंबरला भरणाऱ्या यात्रेत सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांविरोधात निषेध फलक लावून त्यांना गावबंदी करण्यावर चर्चा झाली, तो बहुमताने ठराव मंजूर झाला. यावेळी सरपंच अहिरे, उपसरपंच शिवाजी पाटील, माजी सरपंच रामसिंग गिरासे, माजी उपसरपंच विक्रम तायडे, भगवान पाटील, भीमसिंग गिरासे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
गावबंदीने प्रश्न सुटेल का? 
माजी उपसरपंच व शिंदखेडा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे उपाध्यक्ष विक्रम तायडे यांनी ग्रामसभेला संबोधित करताना सांगितले, की पाणीटंचाईचा प्रश्न विखरणप्रमाणे अनेक गावांत आहेत. त्यामुळे नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना गावबंदी करून किंवा त्यांच्या निषेध फलकाने हा प्रश्‍न सुटणार नाही. नियमानुसार शासनस्तरावरून फायली फिरवण्यात व प्रस्ताव करून मंजुरीसाठी वेळ द्यावा लागतो. या ठरावास केवळ श्री. तायडे यांनी विरोध नोंदविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com