esakal | बिहारच्या युवकाचा मृतदेह दोंडाईचातच 24 तास पडून 
sakal

बोलून बातमी शोधा

death body

धुळ्याहून कीट आणल्यानंतर त्याचे "स्वॅब' तपासणीसाठी घेण्यात आले. त्यानंतर तरुणाला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. मात्र, त्याच्यावर येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्काराला परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविल्याने मोठा गोंधळ उडाला. अखेर पूर्ण परिसर सॅनिटाइज करण्याच्या अटीवर रात्री नऊला तरुणावर अंत्यसंस्कार झाले. 

बिहारच्या युवकाचा मृतदेह दोंडाईचातच 24 तास पडून 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दोंडाईचा : येथील उपजिल्हा रुग्णालयात काल (ता. 29) सायंकाळपासून दाखल बिहारमधील 25 वर्षीय तरुणाचा लगेचच मृत्यू झाला. त्याच्यात "कोरोना'सदृश लक्षणे आढळल्याने रुग्णालयातील यंत्रणेची एकच तारांबळ उडाली. मात्र, रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी कीटच नसल्याने अडचणी आणखी वाढल्या. तेव्हापासून आज रात्री आठपर्यंत तरुणाचा मृतदेह रुग्णालयातच पडून होता.

आवर्जून वाचा - Video घरी जाण्याची ओढ मुंबई ते अलाहाबाद पायी प्रवास..पण घरात घेतील का माहित...
 


शहराबाहेरील एका शेतात काम करणाऱ्या बिहारमधील 25 वर्षीय तरुणाला त्याच्या मित्रांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याला दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे व त्याच्यात तापासह "कोरोना'सदृश लक्षणे आढळल्याचे डॉ. सचिन पारख यांनी सांगितले. दरम्यान, त्याच्या "स्वॅब'चे नमुने घेण्यासाठी रुग्णालयात कीटही उपलब्ध नव्हते. येथील यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे तरुणाचा मृतदेह रुग्णालयातील विच्छेदनगृहातच आज दुपारपर्यंत पडून होता. याची माहिती मिळताच अपर तहसीलदार सुदाम महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर यंत्रणा कामला लागली. मृताच्या स्वॅबचे नमुने घेण्यासाठी धुळ्याहून कीट व पीपीई कीट मागविण्यात आले. त्यानंतर नमुने घेऊन तरुणाचा मृतदेह पीपीई कीटमध्ये ठेवून अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. मात्र, येथील अमरधाममध्ये तरुणावर अंत्यसंस्कारासाठी स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने रात्री नऊपर्यंत गोंधळाची स्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. 
याबाबत शहरात माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने भीतीचे वातावरण तयार झाले. अपर तहसीलदार महाजन, मुख्याधिकारी डॉ. सावंत, वैद्यकीय अधीक्षक ललितकुमार चंद्रे, आरोग्य निरीक्षक शरद महाजन, अभियंता शिवनंदन राजपूत, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड, संतोष लोले पोलिस कर्मचाऱ्यांसह परिस्थिती हाताळत होते.