दुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. विवाहितेसह निष्पाप सहावर्षीय चिमुकल्याचा निर्घृणपणे केलेला खून हे फाशी देण्यामागील मुख्य कारण असल्याचे न्या. शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी फिर्यादी कचरू संसारे यांनी न्यायालयाच्या निकालाबद्दल,माझ्या मुलींना न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली. 

नाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी फाशीची शिक्षा ठोठावली. विवाहितेसह निष्पाप सहावर्षीय चिमुकल्याचा निर्घृणपणे केलेला खून हे फाशी देण्यामागील मुख्य कारण असल्याचे न्या. शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी फिर्यादी कचरू संसारे यांनी न्यायालयाच्या निकालाबद्दल,माझ्या मुलींना न्याय मिळाला अशी भावना व्यक्त केली. 

आरोपी रामदास शिंदे याने भाडेकरी असलेले कचरू संसारे यांची पत्नी पल्लवी(30 वर्ष) व मुलगा विशाल(सहा वर्ष) यांचा 18 एप्रिल 2016 च्या मध्यरात्री निर्घृणपणे खून केला. बचाव पक्षातर्फे ऍड. अस्लम देशमुख यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी 20 साक्षीदार तपासले.

या घटनेत एकही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता मात्र घटनेनंतर पसार झालेला आरोपी रामदास शिंदे याने त्याचा मित्र सुभाष राजपूत यास फोनवरून संपर्क साधत आपल्या हातून घडलेल्या कृत्याची माहिती दिली होती. हा पुरावा न्यायालयात सादर करतांना आधुनिक तंत्रज्ञान स्पेक्‍टोग्राफीच्या माध्यमातून तो सिद्ध केला. आरोपी शिंदे याचाच तो आवाज असल्याचे सिद्ध झाले

   परिस्थितीजन्य पुराव्याच्याआधारे न्या. सूर्यकांत शिंदे यांनी आरोपी शिंदे यास दोषी ठरविले. त्यानुसार आज फाशीची शिक्षा ठोठावली. अत्यंत निर्दयीपणे कृत्य करण्याच्या या घटनेत आरोपीला फाशीचीच शिक्षा योग्य असल्याचे न्या.शिंदे यांनी स्पष्ट केले. सातपूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन तपास अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ गायकवाड यांनी गुन्ह्याचा तपास केला. 

स्पेक्‍टोग्राफीच्या आधारे आरोपीची गुन्ह्याची कबुली न्यायालयात ग्राह्य धरली गेल्याने हा दूर्मिळ खटला आहे. त्याद्वारे आरोपीला फाशीची शिक्षा होणे. असा राज्यातील पहिला निकाल आहे. अत्यंत थंड डोक्‍याने करण्यात आलेला हा गुन्हा होता. समाजाला काळीमा फासणार प्रकार होता. त्यासाठी आरोपीला फाशीचीच शिक्षा योग्य होती. 
- ऍड. अजय मिसर, प्रमुख जिल्हा सरकारी वकील. 

आज न्याय मिळाला. माझ्यापेक्षा आईविना पोरक्‍या झालेल्या माझ्या तीन मुलींना न्याय मिळाला. आरोपीमुळे त्या आई अन्‌ भावाला मुकल्या. या घटनेमुळे माझा संसार उदध्वस्त झाला. 
- कचरू संसारे, मृत पल्लवी संसारे यांचा पती. 

घटनाक्रम : 
17 एप्रिल 2016 : कचरू संसारे हे पत्नी पल्लवी व मुलगा विशालसह सातपूरमधील आपल्या भाडयाच्या घरी तीन दिवसांच्या सुट्टीनंतर परतले. 
17 एप्रिल 2016 : कचरू संसारे कंपनीत कामाला असल्याने रात्रपाळीसाठी ते कामावर गेले. 
18 एप्रिल 2016 : 17 व 18 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे याने आतील दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश. गाढ झोपलेल्या पल्लवी हिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न. पल्लवीने नकार दिल्याने त्याने घरातीलच चाकूने तिच्यावर 28 वार करून केला खून. झटापटीमुळे जाग आलेल्या विशाल यालाही पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने 24 वार करीत त्याचाही निर्घृणपणे खून. 
18 एप्रिल 2016 : खून केल्यानंतर दाराला बाहेरून कुलूप लावून पसार 
18 एप्रिल 2016 : सकाळी कचरू संसारे कामावरून आल्यानंतर घराला कुलूप पाहून पत्नी-मुलाची शोधाशोध. बऱ्याच वेळानंतर कुलूप तोडून आतमध्ये दोघेही रक्ताच्या थारोळ्यात 
18 एप्रिल 2016 : सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल. खुनाचा गुन्हा दाखल. 
19 एप्रिल 2016 : एक्‍स्लो पॉईंट परिसरातून आरोपी शिंदे यास अटक. 
15 जुलै 2016 : न्यायालयात दोषारोपपत्र सादर 
24 एप्रिल 2018 : दुहेरी खूनप्रकरणी आरोपी रामदास शिंदे दोषी 
25 एप्रिल 2018 : अंतिम युक्तिवाद 
26 एप्रिल 2018 : आरोपी रामदास शिंदे यास फाशीची शिक्षा ठोठावली. 

Web Title: marathi news double murder case