हायपरसॉनिकद्वारे क्षेपणास्त्रात आघाडीची भारताला संधी: डॉ.पिल्लई 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नाशिक : काही वर्षांपूर्वीपर्यंत संरक्षण क्षेत्रातील संशोधनातील प्रयोगांत भारताचा सहावा-सातवा क्रमांक होता, पण देशाने स्वयंपूर्ण असावे, या हेतूने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली रशियाच्या सहयोगाने "ब्राह्मोस' सुपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्यात यशस्वी होऊन तंत्रज्ञानाच्या शोधात अव्वल क्रमांक मिळविला.

नाशिक : काही वर्षांपूर्वीपर्यंत संरक्षण क्षेत्रातील संशोधनातील प्रयोगांत भारताचा सहावा-सातवा क्रमांक होता, पण देशाने स्वयंपूर्ण असावे, या हेतूने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली रशियाच्या सहयोगाने "ब्राह्मोस' सुपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्यात यशस्वी होऊन तंत्रज्ञानाच्या शोधात अव्वल क्रमांक मिळविला.

   सध्या भारतासह जगभरात हायपरसॉनिक तंत्रज्ञानावर क्षेपणास्त्र विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुन्हा एकदा भारताला बाजी मारण्याची संधी आहे, असा विश्‍वास ब्राह्मोसचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) मुख्य नियंत्रक (चीफ कंट्रोलर, रिसर्च ऍन्ड डेव्हलपमेंट) डॉ. ए. सिवाथनू पिल्लई यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केला. 

संदीप विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शनासाठी आलेल्या डॉ. पिल्लई यांनी "सकाळ'शी विविध विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, की "डीआरडीओ'तर्फे संरक्षण क्षेत्रातील संशोधन करताना अग्नी, पृथ्वी आणि आकाश यांसारखे प्रकल्प मैलाचा दगड ठरले. यादरम्यान अणवस्त्र चाचणीसह अन्य विविध बाबींमध्ये प्रयोग करण्यात भारत सहाव्या-सातव्या स्थानी राहत होता. भारताचा संशोधनात अव्वल क्रमांक असावा, असे स्वप्न माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी पाहिले होते.

सबसॉनिक तंत्राद्वारे अमेरिका क्षेपणास्त्रात अव्वल असताना भारताने ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र साकारून जगाचे लक्ष वेधले. मिसाइल टेक्‍नॉलॉजी कंट्रोल रिजन (एमटीसीआर)द्वारे जगभरातील देशांनी तंत्रज्ञान आदानप्रदान करण्यात मर्यादा आणल्या, पण रशियाच्या सहाय्याने सुपरसॉनिक क्षेपणास्त्र साकारण्याचा बहुमान भारताने पटकावला. देशाची कामगिरी लक्षात घेता भारताला अलीकडच्या काळात "एमटीसीआर'मध्ये स्थान मिळाले आहे. 

ब्राह्मोसचे तंत्रज्ञान असे 
आवाजाच्या गतीपेक्षा वेगवान सबसॉनिक तंत्राचे क्षेपणास्त्र असते, पण ब्राह्मोस आवाजाच्या गतीच्या तीनपटीने गती असलेले क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या सहयोगाने बनविलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियातील मॉस्कवा नदी यांच्या मिश्रणातून ठेवण्यात आले. पाण्याखाली, मोबाईल लॉंचरद्वारे अशा विविध पद्धतीने चाचणी यशस्वी झालेली आहे. आगामी काळातील हायपरसॉनिक तंत्राचे क्षेपणास्त्र आवाजाच्या गतीपेक्षा सातपटीने गतिशील असेल. यापलीकडे जाऊन "सुदर्शन चक्र' या संकल्पनेवरदेखील संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातील लोक लढवय्ये 
डॉ. पिल्लई म्हणाले, की महाराष्ट्राला उज्ज्वल इतिहास लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शिवाजी महाराज, तर स्वातंत्र्य काळातही या भूमीतून लढवय्ये तयार झाले. आजही सैन्यदलात मराठा बटालियन कार्यरत आहे. इस्रो, डीआरडीओमध्येही मराठी संशोधकांची संख्या लक्षणीय आहे. महाराष्ट्रातील लोक लढवय्ये असल्याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले. 

विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे 
अंतराळ, संरक्षण क्षेत्रातील संशोधनात देशाने आघाडी घेण्यासाठी येथील तरुणाईचे महत्त्वपूर्ण योगदान ठरू शकते. युवाशक्‍ती हे देशाचे बलस्थान आहे. युवकांनी केवळ चांगल्या पॅकेजच्या नोकरीचा शोध न घेता, संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील संशोधनावर भर दिला पाहिजे. त्यासाठी विद्यापीठे, इन्स्टिट्यूट यांची भूमिका महत्त्वाची असून, या स्तरावरून संशोधन प्रकल्प अपेक्षित आहे, असे डॉ. पिल्लई यांनी नमूद केले. 

Web Title: marathi news dr.pillai