"सकाळ' ग्राउंड रिपोर्ट  मालेगाव  ...  चुनाव का माहौल है...मालेगाव की गरिबी सबको मुबारक  ... 

residentional photo
residentional photo


मालेगाव म्हणजे महाराष्ट्राचे मॅंचेस्टर. सर्वाधिक मुस्लिम समाजाचे वास्तव्य या शहरात आहे. पॉवरलुम हा येथील व्यवसाय. त्यासाठी उत्तर भारतातून आलेले मजूर येथे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या शहराला अनेक गल्ल्या, बोळ अन्‌ भाग आहेत. जिथे आजही बाहेरचा माणूस पोचू शकत नाही. मग राजकारणी काय पोचणार? येथील सर्व चर्चा फिरते गरिबीभोवती. त्यांचे प्रश्‍न कोणी सोडवेल यावर त्यांचा विश्‍वास नाही. त्यासाठी ते कोणाला दोषीही मानत नाहीत, हेच त्यांचे वेगळेपण. 


मालेगाव शहरातील नागरिकांत दोन विचारप्रवाह दिसतात. कपड्याचा ताणाबाणा गुंफताना त्यातही अगदी सहज ते विलग होतात. शेख, सय्यद ही मंडळी दखनी (स्थानिक), तर पॉवरलुमचे कामगार असलेले उत्तर प्रदेश, बिहारमधून येणारे व तत्सम समाजाची मंडळी अन्सारी. स्थानिक निवडणुकीत सोय पाहून ते सगळे भूमिका ठरवतात. मात्र, सध्या देशाची निवडणूक आहे. त्यात हा फरक केव्हाच गळून पडला आहे. त्यामुळे हॉटेल, चौकांतून लोक गप्पांत नेहमीच रंगलेले दिसतात. या चर्चेत सध्या राजकारणाचा विषय समाविष्ट झाला आहे. बहुतांश लोकांची चर्चा कॉंग्रेस, एमआयएम या पक्षांभोवती फिरते. भाजप त्यांच्या दृष्टीने जणू शहराबाहेरचा पक्ष. अनेक निवडणुकांत त्यांनी कधी कॉंग्रेस सोडून अन्य पक्षांचा फारसा विचारच केला नाही, हे सांगायला ते अजिबात कचरत नाहीत. त्यामुळे निवडणुकांचे वातावरण आहे. त्यात गरिबांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक नेता, पक्ष, अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील गरिबांवरच बोलतात. त्यामुळे किदवाई रोडवरील (कै.) निहाल अहमद यांच्या कार्यालयाबाहेर जमलेल्या गर्दीत एक कार्यकर्ता विनोदाने म्हणत होता, "

चुनाव का माहौल है...मालेगाव की गरिबी सबको मुबारक..!' 
मालेगावचे अनेक प्रश्‍न आहेत. त्यावर अनेक नेते काम करतात. मात्र, मुळातच त्यांना पंचतारांकित सुविधांपेक्षा पाणी, वीज, आरोग्य, दिवाबत्ती, रेशनकार्ड, आधारकार्ड, वीजबिल, मारामारी, मध्यस्थी, पोलिस ठाणे व अतिक्रमण असे प्रश्‍न असतात. त्यासाठी त्यांना जो भेटेल, प्रश्‍न सोडवेल तो त्यांचा नेता असतो. पक्षाचा कार्यकर्ताही त्यांच्यासाठी खूप मोठा असतो. निवडणुकीत काय होईल याचे उत्तर देण्यासही विलंब न करता "कॉंग्रेस को व्होट करेंगे भाई', असे बोलतात. येथील प्रत्येकाकडे संवादात एक पंच हमखास असतो. किदवाई रोडवर फेरफटका मारताना येथील कार्यकर्ता म्हणाला, "ये हमारा बंबई का लॅमिंग्टन रोड है भाई'. मुंबई-अहमदाबादच्या मेट्रोविषयी विचारले तर नागरिक म्हणाला, "हमारे यहॉं सायकल का टायर मिलता है मेट्रो का'. निवडणुकीत पुन्हा "गरिबी हटाव'ची घोषणा आहे. यावर ते म्हणाले, "गरिबी हटी तो नेता लोगों का क्‍या होंगा? गरिबी तो रहनी चाहीए', अशी उत्तरे ऐकून भोवळ येण्याची वेळ आली होती. त्यामुळे येथून काढता पाय घेणेच शहाणपणाचे वाटले. 

शहरातील हजार खोली हा परिसर प्रामुख्याने विणकर मजुरांचा आहे. पूर्वी येथे जमेल तशी घरे बांधली होती. अगदी फुटपाथपर्यंतदेखील घराच्या भिंती असतात. भिंती, छत सगळेच पत्र्याचे. सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे या शहरात उष्मा थोडा जास्तच असतो. घरांच्या खुराड्यात लाही लाही होण्यापेक्षा नागरिक चौकात, रस्त्यावर, मशिदींच्या जवळपास, बाजारात, चहाच्या कट्ट्यांवर गप्पांत रंगतात. या गप्पा अगदी मध्यरात्रीपर्यंत रंगतात. येथील ऍड. तन्वीर शेख याच भागात राहतात. रिजवान खान, टॅक्‍सीचालक मोहसीन शेख, साजीद शेख, वखार व्यावसायिक एखलाख खान, लुम व्यावसायिक एजाज अन्सारी ही सर्व त्यांची मित्रमंडळी. त्यांच्याशी चर्चा होताना त्यात राजकारणापेक्षा दैनंदिन समस्यांवर अधिक गप्पा होतात. राजकारणी मंडळींनी रोजी-रोटी, आरोग्य, रोजचे जगणे, त्यातील प्रश्‍नांवर बोलावे, त्यासाठी काय करणार, हे सांगावे. मात्र, सध्या चर्चा भलत्याच विषयावर जाते. त्यामुळे आपण त्या वादात पडू नये, हा मालेगावकरांचा प्रातिनिधिक सूर जाणवला. 

वर्तमानपत्रांत, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील चर्चेत विकासाच्या खूप गप्पा होतात. कानावर येतात. मात्र, कष्ट केल्याशिवाय हातातोंडाची गाठ पडत नसलेल्या या लोकांपर्यंत ती चर्चाही पोचत नाही. विकासाची फळे चाखण्याची संधी तर खूपच दूर. मात्र, त्याची त्यांना खंत नाही. मतदानात काय करायचे?, याचा त्यांचा निर्णय झालेला आहे. ते सोडून सगळ्या विषयांवर येथील नागरिक कोणाशीच चर्चा करत नाहीत. तरीही ते समाधानी वाटले, हे इथले वेगळेपण. खूप चमत्कारिक वाटत राहिले. इथले गरीब टाइमपास म्हणून राजकारणावर चर्चा करता करता पहाटेपर्यंत जागे राहतात. नेते, कार्यकर्ते, पक्ष, राजकारण, दिल्ली अन्‌ राजकीय पक्षांचे जाहीरनामे त्यांच्या चर्चेत येतात. मात्र, त्यावर नाराज नाहीत. हजार खोली भागातून बाहेर पडता पडता गरिबीवरील शेर आठवला. शायर इबरत मछलीशहरी म्हणतो... 
अपनी गुर्बत की कहानी हम सुनाएँ किस तरह । 
रात फिर बच्चा हमारा रोते रोते सो गया ।। 

... 
देशाची सुरक्षा सर्वांत महत्त्वाची. त्याविषयी कोणाच्याच मनात शंका नाही. मात्र, त्याचे राजकारण होऊ नये. राजकारण गरिबांचे प्रश्‍न, रोजगार, रोजीरोटीवर व्हावे. जो राजकीय पक्ष असे करील त्यालाच आपण मतदान केले पाहिजे. सध्या तर खूप सावध राहून मतदान करण्याचे दिवस आहेत. 
- ऍड. तन्वीर अहमद, सामाजिक कार्यकर्ते 

पॉवरलुमचा प्रश्‍न येथे खूप गंभीर बनला आहे. त्यावर काहीच उपाययोजना होत नाहीत. केवळ योजना मंजूर होतात. सुधारणा शून्य आहेत. जे अनुदान जाहीर होते ते मोठ्या व्यावसायिकांना मिळते. दोन-चार पॉवरलुम असतील त्या गरीब व्यावसायिकांना वंचित ठेवले जाते. निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे. 
- जहुर शेख, सामाजिक कार्यकर्ते 
 
केंद्राकडून शहरांसाठीच्या ज्या योजना मंजूर होतात, त्याचा मालेगावला खूप अल्प निधी व कामे होतात. येथे आरोग्य, प्रदूषणाचा प्रश्‍न खूप गंभीर झाला आहे. सरकारने त्याचा स्वतंत्र विचार करून उपाय व योजना मंजूर केल्या पाहिजेत. त्यामुळे शहराचा विकास होईल. 
- अन्सारी युसूफ नरुलहुदा, सामाजिक कार्यकर्ते 
 

मालेगाव पॉवरलुम विणकरांचे गाव आहे. हा घटक अत्यंत गरिबीत दिवस काढतो आहे. सरकारने त्यांचे प्रश्‍न समजून घेतले पाहिजेत. त्यांची आर्थिक उन्नती, दैनंदिन व्यवहारातील अडचणींचा विचार केला पाहिजे. निवडणुकीच्या निमित्ताने त्यावर काम व्हावे. 
- मुश्‍ताक अन्सारी, कार्यकर्ते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com