नाथाभाऊंचं ठरलंय; 20 डिसेंबरपर्यंत पक्षांतर 

नाथाभाऊंचं ठरलंय; 20 डिसेंबरपर्यंत पक्षांतर 

जळगाव : माझा काही भरवसा नाही, मी केव्हाही पक्ष सोडू शकतो, असा इशारा भाजप नेते एकनाथराव खडसे यांनी दिल्याने आता त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. त्यांचे निकटचे कार्यकर्ते म्हणतात, की नाथाभाऊंचं आता निश्‍चित ठरलंय. 20 डिसेंबरपर्यंत त्यांचा नवीन पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पक्ष कोणता हे मात्र कार्यकर्त्यांनीही अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. 
एकनाथराव खडसे गेली चाळीस वर्षे भारतीय जनता पक्षात कार्यरत असल्याने त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. मंत्रिपद गेल्यानंतर अडचणीच्या काळातही कार्यकर्ते त्यांच्यासोबतच होते. खडसेंवर पक्षाने अन्याय केला असल्याची भावना या कार्यकर्त्यांतही आहे. त्यांनी आता पक्षात न थांबता पक्षांतर करावे, असेही आता कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परळी येथे बोलताना एकनाथराव खडसे यांनी "माझा काही भरवसा नाही, मी केव्हाही पक्ष सोडू शकतो', असा इशारा दिला आहे. त्याचेही कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. खडसे यांनी दिल्लीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार व मुंबईत शिवसेनेचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. याबाबत कार्यकर्ते म्हणतात, की खडसेंचे पक्षांतराचे ठरलंय. ते 20 डिसेबरपर्यंत नवीन पक्षप्रवेश करतील. मात्र, नवीन पक्षाबाबत कार्यकर्त्यांनी नाव उघड केलेले नाही. परंतु शिवसेना किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच ते निश्‍चितपणे जातील, असा विश्‍वासही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 

पक्षात खडसेंवर अन्यायच! 
पक्षात खडसेंवर अन्याय झाला आहे, असे मत कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आले आहे. गेल्या चाळीस वर्षांत त्यांनी पक्ष वाढविण्यसाठी कार्य केले. परंतु पक्षाने सत्ता आल्यानंतर त्यांच्यावर अन्यायच केला. त्यामुळे आता त्यांनी पक्षातून बाहेर पडावे, असा विचारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. 

काय म्हणतात कार्यकर्ते? 

खडसेंनाच पक्ष होत नसेल तर 
रवींद्र पाटील (माजी नगरसेवक
) ः एकनाथराव खडसे यांनी पक्षासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, त्याच पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. जर पक्ष अशा व्यक्तिलाच होत नसेल, तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भविष्यात काय साथ देईल, असा विचारही मनात येत आहे. त्यामुळे खडसेंनी पक्षांतराचा निर्णय घेतला तरी त्या निर्णयासोबत आम्ही राहणार आहोत. 

पक्षातरांचा निर्णय घ्यावाच! 
अशोक लाडवंजारी (माजी नगरसेवक
) ः एकनाथराव खडसे यांनी पक्षवाढीसाठी कष्ट केले आहेत. मात्र, आज पक्षाकडून त्यांच्यावर वारंवार अन्याय होत आहे. तसेच पक्षाच्या वरिष्ठांकडूनही त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. त्यामुळे त्यांनी हा अन्याय किती दिवस सहन करावा. त्यांनी पक्षांतराचा निर्णय घ्यावा. ते जो निर्णय घेतील त्यासोबत पक्ष आहे. 

भाऊंनी पक्ष बदलावा 
विलास धायडे (भाजप उपजिल्हाध्यक्ष, मुक्ताईनगर)
ः एकनाथराव खडसे पक्ष विस्तारासाठी सतत झटत राहिले. आरोग्याच्या समस्या असो की मुलाच्या निधनाचे दु:ख असो सर्व काही बाजूला ठेवून त्यांनी केवळ पक्षाचा विचार केला. मात्र, त्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. त्यामुळे पक्षाचा विस्तारक म्हणून त्यांनी वेगळा विचार करण्याचा निर्णय घ्यावाच त्यांच्या निर्णयासोबत आम्ही आहोत, असेही कार्यकर्त्यांनीही विचार व्यक्त केला आहे. 

पक्षांतराचा निर्णय घेतला तर योग्यच! 
दीपक फालक (माजी सरचिटणीस, भाजप युवा) ः एकनाथराव खडसे पक्षाच्या चौकटीत राहणारे नेते आहेत. महाराष्ट्रासह व उत्तर महाराष्ट्रात त्यांनी पक्षाची जडणघडण केली. मात्र त्यांच्यावर विरोधी पक्षाने नव्हे; तर काही लोकांनी आरोप केल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या चौकशा लावण्यात आल्या. त्यात ते निर्दोष ठरले. त्यानंतरही त्यांनी पक्षाकडे मागणी केली, की मी निर्दोष आहे, हे जाहिर करा, एवढेच नव्हे तर विधीमंडळातही त्यांनी मागणी केली होती. परंतु त्यानंतर पक्षाने आजपर्यंत जाहिर केलेले नाही. त्यांना पक्षाने नेहमीच ताटकळत ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी हा अन्याय किती दिवस सहन करावा, असाच प्रश्‍न आहे. आज भाजप पूर्वीसारखा राहिला नाही, तो बदलला आहे. त्यामुळे खडसेंनी तरी पक्षासोबत का राहावे? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. त्यांनी जर पक्षांतराचा निर्णय घेतला असेल तर योग्य आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com