खडसेंचे पक्षांतर...बदलणार राजकारणाची कूस 

कैलास शिंदे
Friday, 13 December 2019

जळगाव जिल्ह्याचे राजकारण एकेकाळी कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वाभोवती फिरत होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यात बळ धरल्याने पक्षाचे नेते एकनाथराव खडसे, गिरीश महाजन यांच्याभोवतीच राजकारण फिरत राहिले. श्री. खडसे यांनी पक्ष सोडण्याचा इशारा दिला आहे. कोणत्या पक्षात जाणार याची घोषणा त्यांनी केलेली नसली, तरी एकाच पक्षात असताना एकमेकांचे साथी असलेले उद्या एकमेकांच्या विरोधात राहण्याची शक्‍यता आहे आणि जे आधी विरोधात होते, ते एकाच पक्षात दिसण्याचीही शक्‍यता आहे. त्यांचा पक्ष बदलल्यास खानदेशातील राजकारणाची कूसही बदलण्याची शक्‍यता आहे. 

राजकारण काळाप्रमाणे बदलत असते. कोणत्याही एका नेतृत्वाची किंवा एका पक्षाची मक्तेदारी फार काळ कधीच नसते. हे अनेक वेळा दिसून आले आहे. जळगाव जिल्ह्यात वेळोवेळी राजकीय आघाड्यांत बदल दिसून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात एकेकाळी कॉंग्रेसची ताकद होती. त्यावेळी कॉंग्रेसच्या नेतृत्वाभोवतीच जिल्ह्याचे संपूर्ण राजकारण फिरताना दिसत होते. मात्र, याच जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला कमकुवत करीत भारतीय जनता पक्षाने आपले बळ वाढविले. (कै.) उत्तमराव पाटील यांनी जिल्ह्यात पक्ष वाढविला, त्यानंतर एकनाथराव खडसे, गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेते व कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविला. एकसंध पक्षामुळे विरोधकांची अनेक आव्हाने पक्षाने ताकदीने पेलली. पक्षाने केवळ राजकीय ताकदच वाढविली असे नाही, तर सहकार क्षेत्रातही आपले वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे जिल्ह्यात पक्ष म्हटला की "भाजप' असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे अगदी कोणत्याही निवडणुकीचे राजकारण भाजपभोवतीच फिरत होते. जनतेला पक्षाकडून अपेक्षा असल्यामुळे प्रत्येक निवडणुकीत पक्षाला जनतेकडून भरघोस यश मिळत होते. 

सत्ता आल्यानंतर त्यासोबत वादही येतात, असे म्हटले जाते. अगदी त्याचप्रमाणे गेल्या पाच वर्षांत राज्यात भाजपची सत्ता आली, त्यासोबत पक्षात अंतर्गत वादही निर्माण झाले. भाजप नेते एकनाथराव खडसे यांना मंत्रिपदावरून राजीनामा देवून सत्तेतून बाहेर पडावे लागले. त्यामुळे पक्षात अंतर्गत वाद अधिक वाढले. राज्यासह त्याचे पडसाद जिल्ह्यात अधिक उमटले. जिल्ह्यात पक्षाचे खडसे व महाजन यांचे उघड दोन गट झाले. त्यांनी अद्यापही उघडपणे एकमेकांवर टीका केलेली नसली, तरी त्यांच्यातील मतभेद केवळ जिल्ह्याला नव्हे, तर राज्यालाही माहीत झालेले आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. पक्षांतर्गत लोकांनीच हा पराभव घडवून आणला, असा आरोप खडसे यांनी केल्याने पक्षातील अंतर्गत कलह अधिकच वाढला आहे. 

हेही वाचा > नेटकऱ्यांचा कौल : खडसेंनी शिवसेनेत जावे

आपला काही भरोसा नाही
खडसे यांनी पक्षातील नाराजी जाहीरपणे वेळोवेळी व्यक्त केली. त्यामुळे ते पक्षांतर करण्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. परंतु, त्यांनी त्याला स्पष्टपणे नकारच दर्शविला आहे. मात्र परळी येथील गोपीनाथ गडावर पक्षाचे नेते (कै.) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पक्षाला इशाराच दिला आहे, की आपला काही भरवसा नाही, आपण केव्हाही पक्ष सोडू शकतो. खडसे यांचा हा इशारा पक्ष सोडण्याचे निश्‍चित झाल्याचा संकेत आहे. कोणत्या पक्षात जाणार असे त्यांनी जाहीर केलेले नसले, तरी शिवसेना व राष्ट्रवादी असे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी भेटही घेतली आहे. मात्र, त्यांनी जर पक्षांतर केले, तर मात्र जिल्ह्यातील राजकारणाची दिशा निश्‍चित बदलणार आहे. खडसे ज्या पक्षात जातील, त्या पक्षाला निश्‍चित वलय निर्माण होईल. आपली वक्तृत्वाची अस्त्रे ते भाजपविरोधात अधिक जोरदारपणे वापरतील. 

भाजपशी दोन हात 
गेल्या काही वर्षांपासून पक्षात जी घुसमट होत होती, त्याबाबत खडसे पक्षांतरानंतर खुलेपणाने बोलतील. यामुळे भाजपला सर्वच पातळ्यांवर त्यांच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. या शिवाय सहकार क्षेत्रात खडसे यांनी जे भाजपला वर्चस्व मिळवून दिले आहे, ते टिकविण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असणार आहे. जिल्हा बॅंक, दूध फेडरेशन यावर खडसे जातील त्या पक्षाचे वर्चस्व असणार आहे. शिवाय ज्या खडसेंच्या बळावर भाजपने जिल्ह्यात ताकद मिळविली, त्याच भाजपवर त्यांच्यासमोर संघर्ष करण्याची वेळ येणार आहे. शिवाय शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाआघाडी राज्यात आहे. त्यामुळे या सत्तेचे बळही खडसेंच्या पक्षांतरासोबत असणार आहे. परिणामी आगामी काळात खडसे यांनी पक्षबदलाचा निर्णय घेतल्यास जिल्ह्यातील राजकारणात बरीच उलथापालथ होईल, हे मात्र निश्‍चित. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news eknathrao khadse change paksh politics