...मी राजकारणातून संपणार नाही : एकनाथराव खडसे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

भुसावळ : ‘‘कोणी काहीही म्हटले, तरीही मी राजकारणातून संपणार नाही. मात्र, पक्षाला वारंवार प्रश्न विचारतच राहणार माझा काय गुन्हा होता? अगदी ‘सामना’ चित्रपटातील ‘त्या मारुती कांबळेचे काय झालं?’ या प्रश्नासारखा,’’ असे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले. 

भुसावळ : ‘‘कोणी काहीही म्हटले, तरीही मी राजकारणातून संपणार नाही. मात्र, पक्षाला वारंवार प्रश्न विचारतच राहणार माझा काय गुन्हा होता? अगदी ‘सामना’ चित्रपटातील ‘त्या मारुती कांबळेचे काय झालं?’ या प्रश्नासारखा,’’ असे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले. 

भुसावळ मतदारसंघात आमदार संजय सावकार यांनी शासनाच्या अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या. वीज, पाणी, रस्ते यासह मूलभूत प्रश्‍न सोडवून उद्योगवाढीसाठी प्रयत्न केले आहेत. या विकासकामांच्या बळावरच त्यांना निश्‍चितच ५२ हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्‍वास माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला. भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार रक्षा खडसे, भाजपचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, उपनगराध्यक्ष शेख शफी, शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, मनोज बियाणी, रजनी सावकारे, शैलजा पाटील, किरण कोलते, रिपब्लिकन पक्षाचे रमेश मकासरे, लक्ष्मण जाधव आदी होते. श्री. खडसे म्हणाले, की माझ्या कठीण काळात जवळचे पळाले. मात्र, आमदार सावकारे माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. जवळच्या लोकांना भीती वाटत होती, की नाथाभाऊंच्या जवळ राहिलो तर आपली उमेदवारी काढली जाईल की काय? पण, सावकारे यांनी अशी कोणतीही भीती बाळगली नाही. मी पार्लमेंटरी बोर्डात असल्यामुळे सावकारेंची उमेदवारी निश्चित केली. डॉ. मानवतकर हे माझ्याकडे आले होते. मात्र, त्यांना मी अपक्ष निवडणूक न लढविण्याचा सल्ला दिला होता; परंतु त्यांनी तो मानला नाही. याबाबतीत मला संतोष चौधरींचे कौतुक वाटते व ही गोष्ट माझ्या बुद्धीच्या पलीकडची आहे. अखेर डॉ. मानवतकर यांना त्यांनी बळीचा बकरा बनवलाच. असे असले तरी आमदार सावकारेंनी केलेल्या कामावर त्यांना निश्चितच ५२ हजार मतांचा लीड मिळेल, असेही श्री. खडसे यांनी सांगितले. 

सर्वसमावेशक विकास : सावकारे 
यावेळी आमदार सावकारे म्हणाले, की भुसावळ एमआयडीसीत वीज उपकेंद्र, रस्ते, पाणी व दिवाबत्तीची सोय झाली आहे. चाळीस लहान उद्योग सुरू आहेत. मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यासाठी भुसावळची गुंडगिरी संपणे आवश्यक आहे. माजी आमदार संतोष चौधरींवर टीका करताना ते म्हणाले, की भुसावळच्या घरकुल घोटाळ्यात त्यांना आत जावे लागेल. कारण, ही योजना त्यांच्या काळातच सुरू झाली. शिवाय, शहरात ‘ईडी’ची चौकशीही सुरू आहे. त्यांनी जाहीर केलेला उमेदवार पक्षाने नाकारल्याने त्यांची पक्षातील पत लक्षात आली. जे स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत, ते इतरांना काय निवडून देणार? अखेर जनतेने त्यांना त्यांची लायकी दाखविली, अशी टीकाही त्यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news eknathrao khadse political not ending