दराडेंनी फडकवला "भगवा',सरळ लढतीत  दराडेंना 399, राष्ट्रवादीच्या सहाणेंना 232 मते

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

नाशिक ः विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पहिल्यांदा शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड्‌ शिवाजी सहाणे यांचा 167 मतांनी दणदणीत पराभव करत पहिल्यांदा "भगवा' फडकवला. श्री. दराडेंना 399, तर ऍड्‌. सहाणेंना 232 मते मिळाली.

नाशिक ः विधानपरिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पहिल्यांदा शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार ऍड्‌ शिवाजी सहाणे यांचा 167 मतांनी दणदणीत पराभव करत पहिल्यांदा "भगवा' फडकवला. श्री. दराडेंना 399, तर ऍड्‌. सहाणेंना 232 मते मिळाली.

या यशानंतर नाशिकमध्ये ठासून घेतले, आता पालघरमध्ये याहून अधिक ठासून घेऊ, अशा शद्बांमध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया नोंदवली. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात सकाळी आठला मतमोजणी सुरु झाली. त्यात 644 मतांपैकी 13 मते अवैध ठरली. सकाळी दहाला मतमोजणीचे चित्र 
स्पष्ट झाले. दुपारी बाराला जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्णन बी. यांनी निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर निकाल जाहीर केला.

निवडणूक निरीक्षक पराग जैन यांच्या उपस्थितीत श्री. दराडेंना निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आले. मतमोजणीसाठी शिवसेनेतर्फे माजी महापौर विनायक पांडे, शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, किशोर दराडे हे अन्‌ आघाडीतर्फे भाजपचे नगरसेवक सचिन ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अर्जून टिळे मतदान प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी भाजपने ऍड्‌. सहाणे यांना पाठिंबा जाहीर करत वाऱ्यावर सोडलेले परवेझ कोकणी हेही मतमोजणीसाठी उपस्थित होते. 

भगवामय "जल्लोष' 
मतमोजणीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर श्री बडगूजर व श्री. पांडेंनी मतदान मोजणी केंद्रातून मुंबईला पक्ष नेत्यांना फोन लावून निकाल एकवला. श्री. दराडे हे विजयी झाल्याचे जाहीर होताच, शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार भगवामय जल्लोष सुरु केला. सकाळी साडेदहाला ऍड्‌. सहाणे हे समर्थकांसह रवाना झाले. दुसरीकडे ढोल ताशाचा गजरात गुलालाच्या उधळणीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रंगून गेले. कार्यकर्त्यानी दराडेंना उचलून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराबाहेर नेले. "कोण आला कोण आला, शिवसेनेचा वाघ आला', अशा घोषणा देत कार्यकर्ते मिरवणुकीने कार्यकर्ते रवाना झाले. गर्दीत एकाने खिसे कापण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

कागदावरील पक्षीय बलाबल 
शिवसेना 216 
भाजप 167 
राष्ट्रवादी कॉग्रेस 100 
कॉग्रेस 71 
मनसे 06 
जनता दल 06 
देवळा आघाडी 17 
इतर 61 

""शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा पक्षादेश मानून सर्व शिवसैनिकांनी झोकून देऊन काम केले. सगळ्यांच्या एकत्रित कष्टाचा हा विजय आहे. विरोधकांनी जातीयवाद केला. पण शिवसेनेची मत फुटली नाहीत. उलट मालेगाव, सटाणा, त्र्यंबकेश्‍वर, पेठ-सुरगाण्यासह विविध भागातून मदत झाली. यशात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचे प्रयत्न राहिलेत. परवेझ कोकणी यांची मदत झाली.'' 
-नरेंद्र दराडे (शिवसेना विजयी उमेदवार) 

""ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, राज ठाकरे यांनी उमेदवारीची संधी दिली. माझ्या विजयासाठी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते 
झटले. सगळ्यांचे मी आभार मानतो. मला पाठिंबा दिलेल्या भाजपचेही मी आभार मानतो. मी पराभव स्विकारला आहे. पण हा पराभव जनशक्तीकडून नव्हे तर धनशक्तीकडून झालेला आहे.'' 
-ऍड शिवाजी सहाणे (पराभूत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार) 

""भाजपने अपरिहार्य कारणास्तव मला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे मी थांबण्याचा निर्णय घेतला. मला भाजपने वाऱ्यावर सोडल्याचा राग आला अन्‌ या रागाचा फायदा नरेंद्र दराडे यांना झाला आहे. माझी मात्र भाजपबद्दल काहीही तक्रार नाही. संधी मिळेल तसे मी निवडणूक लढवणार आहे.'' 
- परवेझ कोकणी (पराभूत अपक्ष उमेदवार) 

Web Title: MARATHI NEWS ELECTION