Election Results : नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे रिपिट,दिंडोरीत "कमळ' ची हॅट्ट्रिक

live
live

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा खासदारकीची माळ पडली असून दिंडोरीमधून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने "कमळ' ने हॅट्ट्रिक साधली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 लाख 64 हजार मतांनी पुढे होते. दिंडोरी लोकसभा मतदार संघात 25 व्या फेरी अखेर भारती पवार ह्या 1 लाख 96 हजार मतांनी पुढे होते. 
   

नाशिकमधील अद्याप 4 फेऱ्या बाकी असल्या, तरी गोडसे यांच्या बाजूनेच कल दिसून येत आहे. रात्री उशिरा विजयी उमेदवार घोषित होईल. नाशिककर दोनदा खासदार निवडून देत नाहीत ही परंपरा नाशिककरांनी खंडित केली आहे. पुन्हा एकदा मोदी लाटेवर नाशिककर स्वार झाले असून, अपक्ष व वंचित बहुजन आघाडीचा फारसा परिणाम झाला नाही. दिंडोरीत राष्ट्रवादीचे आर्मस्ट्रॉंग नेते छगन भुजबळ, त्यांचा मुलगा आमदार पंकज भुजबळ यांच्या अनुक्रमे येवला आणि नांदगाव विधानसभा गडात राष्ट्रवादीला धक्का बसला. 
   

सकाळी आठला अंबड वेअर हाउस येथे मोजणीला सुरवात झाली. नाशिक आणि दिंडोरीसाठी प्रत्येकी 84 टेबलं मांडण्यात आली होती. प्रारंभी पोस्टल व सर्व्हिस मते मोजण्यात आली. पहिल्या फेरीचा निकाल सकाळी नऊला बाहेर पडला. मतदारांचा कल बघता शिवसेनेच्या पारड्यात गेल्या निवडणुकीप्रमाणे मतांचे भरघोस दान टाकण्यात आल्याचे स्पष्ट दिसून आले. एकीकडे गोडसे मतांची आघाडी घेत असताना दुसरीकडे भाजप, शिवसेना कार्यालयात जल्लोष सुरू झाला. 
 

खासदारकीची हॅट्ट्रिक करणारे हरिश्‍चंद्र चव्हाण यांची उमेदवारी कापून भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या दिवशी उमेदवारी मिळालेल्या डॉ. भारती पवार यांनी सगळे अंदाज फोल ठरविले आहेत. मागील निवडणुकीत चव्हाण यांच्याप्रमाणे डॉ. पवार यांना मोदी लाटेचा फायदा झाला आहे. 
निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्या उपस्थितीत दिंडोरीची मतमोजणी सकाळी आठला सुरू झाली. पहिल्या फेरीत 11 हजारांची डॉ. पवार यांनी आघाडी घेतली. डॉ. पवार यांनी मताधिक्‍यात सातत्य राखले. सायंकाळपर्यंत जाहीर झालेल्या 25 व्या फेरीअखेर डॉ. पवार यांना एक लाख 96 हजारांहून अधिक मताधिक्‍य मिळाले. 

  चार विधानसभा मतदारसंघांत मुसंडी 
डॉ. पवार यांनी येवला, नांदगाव, चांदवड-देवळा, निफाड या विधानसभा मतदारसंघांतून मुसंडी मारली. कळवण-सुरगाणा आणि दिंडोरी-पेठमधून महाले यांना आघाडी मिळत राहिली तरी ती मताधिक्‍यासाठी तोकडी ठरली. मतमोजणी कक्षात दुपारनंतर आमदार गावित दाखल झाले. डॉ. पवार सप्तशृंगगडावर दर्शन घेऊन सायंकाळी नाशिकमध्ये आल्यातर हेमंत गोडसे हे त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन आले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com