दुष्काळाने निवडणुकीचा माहोल थंड 

residentional photo
residentional photo


नाशिक ः सिन्नरपासून देवळ्यापर्यंतच्या दुष्काळी पट्ट्यात मतदानाला जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी उरला असला, तरीही लोकसभा निवडणुकीचा माहोल तयार झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची भ्रांत असल्याने कोण काय म्हणतेय, याकडे ढुंकून पाहायला शेतकरी तयार नाहीत. एवढेच नव्हे, तर पाण्याच्या लोणकढी थापा मारल्या गेल्या, तरीही मतदारराजा भुलण्याचे नाव घेत नाही, हे या वेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. 
"धरण उशाला आणि कोरड घशाला' हे असे का घडतंय, असा प्रश्‍न उपस्थित करण्यास ग्रामस्थ मागे-पुढे पाहत नाहीत. "पाणी आणू', "पाणी पुरवू', असे वारेमाप सांगितले जात असले, तरीही मतदान झाले, की राजकारण्यांना पाण्याचा विसर पडत असल्याचा संताप ग्रामीण भागातून व्यक्त होऊ लागला आहे. ही बाब साऱ्याच राजकीय पक्षांच्या उमेदवारांपासून ते त्यांच्या समर्थकांसाठी डोकेदुखी बनली आहे. राजकीय पक्षाची सभा म्हटल्यावर यापूर्वी गाव जमा व्हायचा. पण आता तशी परिस्थिती राहिलेली दिसत नाही. चौकसभांसारख्या भेटीगाठी घेत उमेदवारांना पुढच्या गावाचा रस्ता धरावा लागतोय. 


पाणी पळविण्याचा संताप 

जनावरे जगविण्याचे आव्हान उभे ठाकलेले असताना टॅंकर आला तर प्यायला पाणी, अन्यथा डोईवर हंडा घेऊन पाण्यासाठी भटकंती करायची, असा दिनक्रम ग्रामीण भागात तयार झाला आहे. त्यामुळे फारशा स्वारस्याने लोकशाहीच्या उत्सवाकडे कितपत पाहिले जाते, हा प्रश्‍न ग्रामीण भागातून पाहायला मिळतोय. परिणामी गावागावांमधून निवडणूक आहे की नाही? इतपत परिस्थिती पाहायला मिळते. गावात पाणीयोजना झाली, परंतु महिलांच्या डोईवरचा हंडा उतरलेला नाही, असेही चित्र अनेक गावांमधून दिसते. आपल्या भागातील धरणातील पाणी पळविण्याचा संताप मात्र गावांमधून व्यक्त होत आहे. पाण्यावाचून विकासाच्या योजना रखडल्याने रोजगारनिर्मितीवर मर्यादा आल्याची खंत ग्रामस्थ मांडताहेत. ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा काहींनी सोशल मीडिया, दृक-श्राव्य माध्यमातून तयार झालेल्या वातावरणावर समाधान मानावे लागत असल्याचे म्हटले. काहींनी पैसेवाले, राजकारण्यांपुरता निवडणुकीचा उत्साह असल्याची प्रतिक्रिया नोंदवली. 

राष्ट्रीय मुद्दे खेड्यात कुचकामी 

सत्ताधारी व विरोधकांकडून राष्ट्रीय मुद्दे चर्चेत आणले जात असले, तरीही त्याचे साधे सूतोवाच खेड्यातून होताना दिसत नाही. प्रत्येकाला आपल्या जगण्याच्या लढाईतून सुटका व्हावी यावर भर असल्याचे सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, देवळा, निफाड, येवला व नांदगाव तालुक्‍यांतील संवादातून प्रकर्षाने जाणवले. शिक्षक भरतीविषयीच्या प्रतिक्रिया सरकारविरोधात व्यक्त होताहेत. शिक्षक म्हणून नोकरी मिळत नसल्याने लग्न होणे मुश्‍कील झाल्याची व्यथा तरुण मांडताहेत. मग "चौकीदार'बद्दल काय?, असे विचारल्यावर चौकीदाराला पगार किती, असा प्रतिप्रश्‍न पुढे आला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com