Vidhan sabha : विधानसभा निवडणुकीचे रण पेटले! 

Vidhan sabha : विधानसभा निवडणुकीचे रण पेटले! 

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असून, प्रचाराची ही रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी (ता. 21) मतदान होणार असल्याने तत्पूर्वी, शनिवारी (ता. 19) प्रचारतोफा थंडावणार असल्याने प्रचारासाठी आता अवघे 72 तास उरले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी गावोगावी, विविध भागांत फिरून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींसह कॉर्नर सभांवर भर दिल्याचे दिसून येते. 

राज्य विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 21) मतदान होणार असून, 24 ऑक्‍टोबरला मतमोजणी होईल. सात ऑक्‍टोबरपर्यंत माघारी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या निवडणुकीच्या प्रचाराला गती आली. जिल्ह्यातील 11 मतदारसंघांत प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोचली असून, प्रचारात कमालीची रंगत आली आहे. 

आता तीन दिवस उरले 
प्रचार अंतिम टप्प्यात पोचलेला असताना त्यासाठी आता अवघे तीन दिवस, म्हणजे 72 तास राहिले. शनिवारी (ता. 19) सायंकाळी प्रचारतोफा थंडावतील. त्यामुळे आता या अंतिम तीन दिवसांत प्रचारतोफा तीव्रपणे धडाडतील. बुधवारी दिवसभरात विविध ठिकाणी उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींवर भर दिला. काही ठिकाणी उमेदवार, पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कॉर्नर सभाही घेतल्या. भुसावळमध्ये रात्री भाजप नेते एकनाथराव खडसेंची जाहीर सभा झाली. आता तीन दिवसांत आणखी काही सभांचे नियोजन उमेदवारांकडून सुरू आहे. 

आज अमोल कोल्हे, महाजनांची सभा 
प्रचाराच्या या रणधुमाळीत गुरुवारी (ता. 17) एरंडोल येथे "राष्ट्रवादी'चे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार तथा अभिनेते अमोल कोल्हे यांची जाहीर सभा होणार आहे; तर अमळनेरला भाजपचे उमेदवार शिरीष चौधरींच्या प्रचारासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन प्रचारसभेस संबोधित करतील. येत्या दोन दिवसांत चाळीसगावला मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होण्याची शक्‍यता आहे. 

जळगाव जिल्ह्यातील केवळ लेवा समाजच नव्हे; तर सर्व समाज, जाती-धर्मातील लोक भाजपसोबत आहेत. त्या बळावरच आतापर्यंतच्या विविध निवडणुकांमध्ये भाजप अव्वल ठरला. पक्षाने मलाही भरभरून दिले. लेवा समाजातील नेत्यांनाही पक्षाने महत्त्वाची पदे दिली. त्यात कुठलाही भेद केला नाही. त्यामुळे या निवडणुकीतही सर्व समाजांतील मतदारांनी भाजप- शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे. 
- एकनाथराव खडसे भुसावळमधील सभेतून... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com