टक्‍के नको, क्रेडीट सिस्टीमच हवी, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची मागणी

live
live

नाशिक : तृतीय वर्ष अभियांत्रिकीचा निकालासंदर्भात झालेल्या गोंधळामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (ता.13) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र गाठत आंदोलन केले. निकालात टक्‍केवारीऐवजी क्रेडीट सिस्टीमनुसार जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दरम्यान विविध पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनीही उपकेंद्र गाठत आंदोलन छेडले. 

विद्यार्थी संघटनांकडून पुकारलेल्या आंदोलनामुळे उपकेंद्रांवर पोलिसांना पाचारण करण्याची वेळ ओढावली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत क्रेडीट सिस्टीमनुसार निकाल जाहीर करण्याची मागणी केली. अधिसभा सदस्य अमित पाटील तसेच विजय सोनवणे यांनीही पुणे विद्यापीठाशी संपर्क साधून, यासंदर्भात विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्याचा आग्रह परीक्षा नियंत्रकांकडे धरला. 

अभाविपचा आंदोलनाचा पावित्रा 
अखिल भारतीय विद्यार्थी परीषद (अभाविप)तर्फे निवेदन देण्यात आले. विद्यार्थी हिताचा निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा पावित्रा महानगरसहमंत्री प्रथमेश नाईक, हेमराज देवरे, राकेश साळुंके, नितीन पाटील, अथर्व कुलकर्णी, गणेश सोनी, दीपक बचाते, स्नेहा भालेराव आदींनी केले. 


युवा सेनेतर्फे सोशल मिडीयावर जनजागृती 
युवा सेनेचे महानगरप्रमुख आदित्य बोरस्ते, अधिसभा सदस्य अमित पाटील यांनीही यावेळी उपकेंद्रावर भेट देत अधिकारी योगेश सोनार यांना निवेदन देत विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या हक्‍कासाठी संघटना पाठपुरावा करत असून, विद्यार्थ्यांनी तणावात येऊन टोकाची भुमिका घेऊ नये, गैरपाऊल उचलू नये यासंदर्भात जनजागृती करणारी चित्रफीत सोशल मिडीयावर शेअर केली जाणार असल्याचे आदित्य बोरस्ते यांनी सांगितले. विशाल खैरनारसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. 


राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस आज विद्यापीठ गाठणार 
राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे आक्रामक पद्धतीने आंदोलन छेडण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मागणीचा पाठपुरवा करण्यासाठी उद्या (ता.14) थेट पुणे विद्यापीठात सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना घेऊन धडकणार असल्याचे संघटनेचे नंदन भास्करे यांनी सांगितले. 


असा आहे गोंधळ 
तृतीय वर्षातील पहिल्या सहामाईत अर्थात पाचव्या सेमिस्टरचा ऑनलाईन निकाल क्रेडीट सिस्टीमनुसार जाहीर केला होता. नंतर गुणपत्रिकेवर टक्‍केवारीनुसार गुण दिले होते. सहाव्या सत्राचा निकाल क्रेडीट सिस्टीमनुसार लागेल, असा समज विद्यार्थ्यांचा झाला. दरम्यान 46 क्रेडीट पॉंईटपैकी 23 पॉंईट मिळविणारे विद्यार्थी चौथ्या वर्षात प्रवेशास पात्र होतील, अशी अट होती. परंतु टक्‍केवारीप्रमाणे निकाल जाहीर केल्याने अनेक विद्यार्थी तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाल्याने त्यांना "इयर ड्रॉप' (वायडी) लागल्याने त्यांचे वर्ष वाया जाण्याची परीस्थिती निर्माण झाली आहे. 


विद्यार्थ्यांची भुमिका परीक्षा नियंत्रकांकडे मांडली आहे. सोमवारी विद्यापीठात यासंदर्भात बैठक होणार असून विद्यार्थी हिताचा निर्णय घ्यावा, असा आमचा आग्रह असेल. 
-अमित पाटील, अधिसभा सदस्य. 

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अशी आमची भुमिका आहे. या पार्श्‍वभुमिवर कुलगुरूंशी भेट घेऊन लवकरात लवकर तोडका काढण्याचा प्रयत्न करणार आहे. 
-विजय सोनवणे, अधिसभा सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com