एरंडोल, पाचोरा, रावेरमध्ये पारंपरिक लढती 

एरंडोल, पाचोरा, रावेरमध्ये पारंपरिक लढती 

जळगाव ः शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारांना "एबी' फॉर्म देण्यात आले आहेत; तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपतर्फेही उमेदवार निश्‍चित आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील एरंडोल, पाचोरा व रावेर मतदारसंघात पारंपरिक लढतींचे चित्र असून, गेल्या लढतीतील उमेदवारच एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आता यावेळी कुणाची सरशी होणार याकडेच लक्ष असणार आहे. 

शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारांना "एबी' फॉर्म देण्यात आले आहेत. यात पाचोरा मतदारसंघातून विद्यमान आमदार किशोर पाटील, एरंडोल मतदारसंघातून माजी आमदार चिमणराव पाटील, जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील, तर चोपडा मतदारसंघातून सौ. लता सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे युतीत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जिल्ह्यातील चारही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निश्‍चित झाले आहेत. 

चौधरी विरुद्ध जावळे 
कॉंग्रेसतर्फे जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात माजी आमदार शिरीष चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे; तर भाजपतर्फे आमदार हरिभाऊ जावळे मैदानात आहेत. आमदार जावळे यांनी महिन्यापासूनच प्रचार सुरू केला आहे. गेल्यावेळीही या दोन्ही उमेदवारांमध्येच प्रमुख लढत होऊन आमदार जावळे यांनी बाजी मारली होती. यावेळीही दोन्ही उमेदवार कसून प्रचार करीत आहेत. आमदार जावळे यांना नुकतेच शासनातर्फे कॅबिनेट दर्जाचे राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासाची ग्वाही श्री. जावळे देत आहेत. तसेच मधुकर साखर कारखान्याला मदतीचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे. दुसरीकडे माजी आमदार चौधरी हे आपल्या कार्यकाळातील कामांची माहिती जनतेला देत आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. 

एरंडोल व पाचोरा मतदारसंघातही गेल्यावेळी लढलेले उमेदवारच पुन्हा एकमेकासमोर उभे ठाकणार आहेत. 
एरंडोल मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील रिंगणात आहेत. गेल्या वेळी डॉ. पाटील यांनी विजय मिळविला होता. यावेळी पुन्हा हे दोन्ही उमेदवार आमनेसामने येत असल्याने कोण बाजी मारणार, याकडेच लक्ष असणार आहे. 

पाटील विरुद्ध वाघ 
पाचोरा मतदारसंघात शिवसेनेतर्फे किशोर पाटील यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी आमदार दिलीप वाघ हे उमेदवार असणार आहे. गेल्यावेळी दिलीप वाघ पराभूत झाले होते. यावेळी कोणाला जनता कौल देणार, याकडे लक्ष असणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com