हुकूमशाही पद्धतीने विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न : आमदार डॉ. पाटील

हुकूमशाही पद्धतीने विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न : आमदार डॉ. पाटील


एरंडोल ः केंद्र व राज्य सरकार हुकूमशाही पद्धतीने विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप एरंडोल- पारोळा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला. 
महात्मा फुले हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आमदार डॉ. पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शहरातून फेरी काढून व शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे, माजी आमदार दिलीप सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा कल्पना पाटील, तिलोत्तमा पाटील, मीनल पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष व मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष तथा कुस्‍तीगीर संघाचे तालुकाध्यक्ष संजय महाजन यांनी आपल्‍या असंख्य कार्यकर्त्यांसह ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला. त्याबद्दल त्‍यांचा आमदार डॉ. पाटील व पदाधिकाऱ्यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्यात आला. 
यावेळी आमदार डॉ. पाटील यांनी माझ्या उमेदवारीमुळे प्रत्येक कार्यकर्त्यात उत्साह असून, प्रामाणिक कार्यकर्ते व मतदारांचा आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. माझी बांधिलकी सर्वसामान्य मतदार, शेतकरी, कामगारांशी असून, त्यांच्या आशीर्वादामुळे माझा विजय निश्‍चित असल्याचा दावाही त्यांनी केला. निवडणूक काळात खोटी आश्वासने देण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, मतदारांनी खोट्या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन केले. 
राज्यातील लाखो तरुणांची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामागे उभी राहिल्यामुळे त्यांना ‘ईडी’च्या चौकशीत अडकविण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाने ज्यांना वाढविले, सत्तेतील पदे दिली, त्यांनीच स्वार्थासाठी पक्षांतर केले असले, तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आजही पक्षासोबत आहेत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांचा सत्तेमुळे आलेला अहंकार व सत्तेची मस्ती या निवडणुकीत जिरवा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी खासदार मोरे यांनी केंद्र सरकार देशाला घातक व मारक असलेले निर्णय घेत असून, देशाची अर्थव्यवस्था बरबाद होत आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे लाखो कंपन्या बंद पडल्या असून, करोडो कामगार बेकार झाले असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मतभेद व मनभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. 
यावेळी माजी आमदार दिलीप सोनवणे, ॲड. विश्वास भोसले, बाळासाहेब पाटील, ॲड. आनंदराव पवार, जळगाव ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार पुष्पा महाजन, जिल्हा सरचिटणीस अमित पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार, तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, शहराध्यक्ष बबलू चौधरी, नगरसेवक डॉ. सुरेश पाटील, असलम पिंजारी, अभिजित पाटील, आशपाक बागवान, नगरसेविका वर्षा शिंदे, सुरेखा चौधरी, माजी उपसभापती प्रा. एस. पी. पाटील, मनोराज पाटील, प्राचार्य गायकवाड, प्रा. हरीश पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहन पाटील, शांताराम पाटील, हिंमत पाटील, प्राचार्य डॉ. ए. आर. पाटील, अशोक वाणी, अहमद सय्यद, राजेंद्र शिंदे, डॉ. राजेंद्र देसले, उमेश देसले, संदीप वाघ, राजू विसावे, विशाल भोसले, गणेश पाटील, अक्षय पाटील, हारुन देशमुख, पांडुरंग बाविस्कर, डॉ. के. ए. बोहरी, दिलीप पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. 

आमदार डॉ. पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करून शहरातून हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढून निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा सरचिटणीस आर. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com