बाजार समितीत शेतकरी-हमाल वादातून  फळ, भाजीपाला विभागातील लिलाव बंद

live photo
live photo

मालेगाव : येथील बाजार समितीत टरबूज विक्रीसाठी आलेल्या परजिल्ह्यातील शेतकऱ्याचे टरबूज चोरणाऱ्या हमालाला जाब विचारला असता हमालाने शेतकऱ्याला मारहाण केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकजुट करीत मारहाण करणाऱ्या हमालावर कारवाई करा असा इशारा देत समितीच्या फळ विभागाचे लिलाव शनिवारी सकाळी बंद केला.

तासाभराच्या वादानंतर समितीचे उपसभापती सुनील देवरे, सचिव अशोक देसले यांनी संबंधितावर कारवाई व पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर लिलाव पुर्ववत सुरु झाले.

आजच्या वाद व मारहाणीनंतर समिती आवारात शेतकऱ्यांच्या मालाची नेहमीच चोरी व हमालांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून शेतकऱ्यांना होणाऱ्या दमबाजीचा मुद्दा चर्चेत आला. दुपारी या मारहाण प्रकरणी समितीचे कर्मचारी प्रदीप धुळकर यांच्या तक्रारीवरुन हमाल रमेश वाघ (रा. आंबेडकरनगर) याच्याविरुध्द कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विजय पवार (रा. रुंधारी, अमळनेर, जि. जळगाव) हे येथील समितीत टरबूज विक्रीसाठी आले.

सकाळी आठच्या सुमारास लिलाव सुरु होतांनाच रमेश वाघने पवार यांच्या मालातील टरबूज चोरी केले. श्री. पवार यांनी जाब विचारला असता वाद वाढला. यातूनच रमेशने पवार यांना मारहाण केली. तोंडावर हाताचा वार वर्मी बसल्याने पवार यांचा डोळा सुजला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

मारहाणीच्या निषेधार्थ शेतकरी एकत्र जमले. संशयितावर कारवाई होवून त्याला अटक हाेत नाही तोपर्यंत लिलाव बंद करु. शेतमालाची चोरी रोखा. जाब विचारल्यास नेहमी वाद होतो. या प्रकारांना आळा घालावा. समितीने दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. लिलाव बंद झाल्याची माहिती मिळताच उपसभापती देवरे, सचिव देसले, संचालक संजय घोडके, फकीरा शेख तातडीने समितीत दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांची भूमिका जाणून घेतली. याउलट हमाल बांधवांनी बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही संशयित चोरी करतात व हमालांची बदनामी होते असे सांगितले.

 सामोपचाराने मार्ग काढण्याचे आश्‍वासन देतांनाच दोषींवर कारवाई करु असे श्री. देवरे व प्रशासनातर्फे सांगण्यात आले. यानंतर लिलाव पुर्ववत सुरु झाला. वाद मिटल्यानंतर कॅम्प पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सावकार व सहकारी बाजार समितीत दाखल झाले. पोलिसांनीही शेतकरी व हमालांची भूमिका जाणून घेतली. कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com