दिव्यांग शेतकऱ्याची  तळवाडे येथे आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

मालेगाव : तळवाडे (ता. मालेगाव) येथील दिव्यांग शेतकरी बापू चिंधा अहिरे (वय 53) यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (ता. 11) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. 

मालेगाव : तळवाडे (ता. मालेगाव) येथील दिव्यांग शेतकरी बापू चिंधा अहिरे (वय 53) यांनी सततची नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (ता. 11) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. 

 बापू अहिरे दोन्ही पायांनी अपंग असतानाही पत्नी व कुटुंबीयांच्या मदतीने दीड एकर कोरडवाहू जमीन कसत उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्यावर सिंडिकेट बॅंकेचे तीन लाख रुपये, तर विविध कार्यकारी सेवा संस्थेचे 25 हजार रुपये कर्ज थकीत होते. सिंडिकेट बॅंक व जिल्हा बॅंकेने कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याने गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. सततच्या नापिकीमुळे त्यांना कर्जफेड अशक्‍य झाली होती. कर्जवसुलीच्या जाचास कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे मुलाने सांगितले.

श्री. अहिरे शिवारातील शेतमळ्यात वास्तव्याला होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, विवाहित मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. 
आत्महत्येची माहिती मिळताच शुक्रवारी (ता. 12) मंडल अधिकारी आर. जी. शेवाळे, तलाठी सुदाम हिरे यांनी अहिरे कुटुंबीयांची भेट घेऊन पंचनामा केला. सामान्य रुग्णालयात शवचिकित्सेनंतर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी तळवाडे येथील विविध संस्था, संघटनांनी केली आहे. 
शासकीय अनास्थेचा बळी 
श्री. अहिरे यांनी 2007 मध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे 10 हजार रुपये कर्ज घेतले होते. व्याजासह त्याची रक्कम 25 हजार झाली, तर सिंडिकेट बॅंकेच्या दीड लाखाच्या कर्जासह व्याजामुळे तीन लाख रुपये झाले. कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळातील कर्जमाफी आणि युती शासनाच्या कार्यकाळातदेखील छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत दीड लाखाची कर्जमाफी झाली. मात्र, अहिरे यांना या दोन्हींचा लाभ का मिळू शकला नाही? कर्जवसुलीसाठी येणारे अधिकारी नोटिशीचा खर्च शेतकऱ्याच्या माथी टाकतात. वसुलीसाठी किती वेळा तगादा लावला याकरिता कर्जदार शेतकऱ्याबरोबरच छायाचित्रही घेतात. कर्जवसुलीच्या या तगाद्यांनी त्रस्त होऊनच शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अहिरे यांची आत्महत्या कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शासकीय अनास्थेचा बळी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news farmer sucide