उत्पादन खर्च निघत नसल्याने टोमॅटो शेतात घातल्या मेंढ्या

दीपक खैरनार 
रविवार, 18 मार्च 2018

टोमॅटो लागवडीसाठी हातउसनवार करत अफाट खर्च केला. टोमॅटो काढणीला आलेल्या मजूरांचे टोमॅटो विक्रीतून मजूरीसुध्दा निघत नाही शेवटी मेंढ्या घालण्याचा निर्णय घेतला.
- गोरख बच्छाव, टोमॅटो उत्पादक, आव्हाटीशिवार.

अंबासन (जि. नाशिक) : "काय करावे काहीही कळत नाही साहेब...डाळींबाची बाग तेल्या, मर रोगामुळे मुळासकट तोडली... अन् हातउसनवार करीत टोमॅटो लागवड केली, टोमॅटोने तर नव्वद हजारात झोपवले.. काय शेती करणार...साहेब", असे केविलवाणी बोल आहेत बागलाण तालुक्यातील आव्हाटी शिवारातील गोरख बच्छाव यांचे.

टोमॅटो लागवडीवर आजतागायत १ लाख दहा हजार रूपये खर्च केला. उत्पादन खर्च सुध्दा निघत नसल्याने त्यांनी थेट बहार धरलेल्या टोमॅटोत मेंढ्या घातल्या.  
टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतक-यांना अर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. विक्रीस आणलेल्या मालातून खर्चदेखील निघत नसल्याने दोन दिवसांपूर्वी तळवाडे दिगर येथील शेतक-याने टोमॅट्यावर ट्रॅक्टर फिरवला. दुसरीकडे आव्हाटी शिवारातील गोरख बच्छाव यांनी मेंढ्या टोमॅटो पिकात घातल्या. बाजारपेठेत अत्यंत कवडीमोलाचा भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. श्री. बच्छाव यांनी मंडपाचा व्यवसाय सोडून शेती उद्योग सुरू केला होता. त्यांनी सुरूवातीला डाळींबांची लागवड केली. मात्र डाळींबाला तेल्या, मर रोगाने ग्रासल्याने एका वर्षापूर्वी मुळासकट तोडली. या वर्षी त्यांनी हातउसनवार करून दीड एकर क्षेत्रात साई बावीस या कंपनीचा जातीचे टोमॅटो वाणाची डिसेंबर अखेरीस लागवड केली. लागवडीपासून आजतागायत एक लाख दहा हजार रूपये खर्च केला. सुरूवातीचा पहिला तोडा सटाणा भाजीमंडीत पंधरा क्रेट्स शंभर ते एकशे दहा रूपये विक्री झाला. त्यानंतर गुजरात येथील बाजारात एकदा चौरेचाळीस व पंचेचाळीस  क्रेट्स विक्रीसाठी पाठविले होते. ३० ते ३५ रूपये प्रतीक्रेट विक्री झाला. संबंधित व्यापाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधला असता पावती बनवायला सुध्दा महाग आहे. असे सांगण्यात आले. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यास दीड एकर टोमॅटोतून चार ते पाच लाख रुपये येणे अपेक्षित होते. मात्र त्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरले. काढणीला आलेल्या टोमॅटोत संतप्त झालेल्या शेतक-याने थेट मेंढ्या घालत शेती आता परवडत नाही. शेतात नेमके काय पिकवावे जेणेकरून उत्पादन खर्च निघेल. टोमॅटोत केलेला एक लाख दहा हजार तोही निघाला नाही. हातउसनवार व औषध विक्रेत्याचे पैसे द्यावे तरी कसे या विवचणेत टोमॅटो उत्पादक सापडला आहे.

Web Title: marathi news farmer tomato loss news nashik news