शेतामध्ये महिलेचा कुटूंबियांसमोर खून

marathi news farmer woman killed
marathi news farmer woman killed

सटाणा - कौतीकपाडे (ता. बागलाण) येथे शेतजमिनीच्या वादातून रायकोरबाई नवल ठाणगे (वय ५०) या महिलेचा काल शनिवार (ता. २७) रोजी निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत मयत महिलेचा मुलगा रमेश नवल ठाणगे (वय २९) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी मालेगाव व त्यानंतर नाशिक येथे हलविण्यात आले आहे. घटनेतील प्रमुख आरोपी प्रताप रुपसिंग दातरे (वय ४५) यास अटक करण्यात आली असून अन्य एक जण फरार झाला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मयत रायकोरबाई ठाणगे यांची कौतीकपाडे शिवारात भाक्षी - वनोली रस्त्यावर चार एकर शेती आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी त्यांनी मुलीच्या लग्नासाठी प्रताप रुपसिंग दातरे यांच्याकडे आपली शेती गहाण ठेवली होती. शुक्रवारी (ता. २६) रायकोरबाई ठाणगे यांनी चिंचगव्हाण (ता. मालेगाव) येथील जावई, मुलगी, दोन मुले यांच्या समवेत गावातील प्रतिष्ठित नागरिकांसोबत प्रताप दातरे यांच्याकडे जमिनीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी रायकोरबाई यांनी प्रताप दातरे यांना उपस्थित सर्वांसमोर दोन लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम देत आपल्या जमिनीचा व्यवहार पूर्ण केला आणि प्रताप दातरे यांच्याकडून व्यवहार पूर्ण केल्याचे सर्व कागदपत्र लिहून आपली जमीन सोडवून घेतली. 

दरम्यान, काल शनिवार (ता. २७) रोजी रायकोरबाई ठाणगे या आपली दोन्ही मुले, मुलगी, जावई व दिराला सोबत घेऊन बैलगाडीवर शेताचा ताबा घ्यायला गेल्या होत्या. शेतात बैलगाडी लावून जावई, मोठा मुलगा मधुकर हे पुढे शेत बघत होते. पाठीमागे रायकोरबाई या लहान मुलगा रमेश सोबत चालत होत्या. याचवेळी पाठीमागून आलेल्या आरोपी प्रताप दातरे व त्याचा पुतण्या अजित धोंडू दात्रे या दोघांनी रायकोरबाई यांच्या डोक्यात अचानक लाकडी दांडा मारल्याने त्या जगीच कोसळल्या. यानंतर प्रताप दातरे व अजित दातरे याने रायकोरबाई यांच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यामुळे रायकोरबाई जागीच ठार झाल्या. दोघा आरोपींनी लहान मुलगा रमेश यांच्या छातीवर देखील वार केलेत. यावेळी रमेशने आरडाओरड केल्याने जावई, मोठा मुलगा, दिर त्वरित धावत आले. त्यांनी प्रताप दातरे यांना मारु नका, असे सांगत असतानाच प्रताप व अजित दातरे यांनी मोठा मुलगा मधुकर, मुलगी, जावई नितीन मांडवडे, चुलता कौतिक ठाणगे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात सर्व जखमी झाले. लहान मुलगा रमेश यास गंभीर इजा झाल्याने त्याला त्वरीत सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे. सटाणा पोलिसांनी आरोपी प्रताप दातरे यास अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अजित दातरे अद्यापही फरार आहे. पोलिस निरिक्षक हिरालाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जिभाऊ पवार, देवराम खांडवी, मन्साराम बागुल पुढील तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com