२० हजार शेतकऱ्यांना मिळणार साडेनऊ कोटीची भरपाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

येवला- कापूस हे येवलेकरांसाठी मागील १८ ते २० वर्षांपासून हक्काचे नगदी पीक बनले आहे. यंदाही हे पिक जोमात आले असतांना या पिकावर गुलाबी बोंड अळीचे आक्रमण केल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या पूर्ण टिमने वेळेत पूर्ण केले असून, तब्बल २० हजार १५९ शेतकर्‍यांच्या १३ हजार ७४८ हेक्टरवरील कपाशीला हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अनुदान जाहिर झाले आहे.

येवला- कापूस हे येवलेकरांसाठी मागील १८ ते २० वर्षांपासून हक्काचे नगदी पीक बनले आहे. यंदाही हे पिक जोमात आले असतांना या पिकावर गुलाबी बोंड अळीचे आक्रमण केल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे तालुका कृषी अधिकारी अभय फलके यांच्या मार्गदर्शना खाली त्यांच्या पूर्ण टिमने वेळेत पूर्ण केले असून, तब्बल २० हजार १५९ शेतकर्‍यांच्या १३ हजार ७४८ हेक्टरवरील कपाशीला हेक्टरी ६ हजार ८०० रुपये अनुदान जाहिर झाले आहे.

तालुक्यात १५ हजार ४५ एकूण कपाशी लागवडीचे क्षेत्र होते. त्यापैकी १३ हजार ७४८ क्षेत्र बोंडअळीने बाधीत झाले होते. दुष्काळी व अवर्षण प्रवण असलेल्या तालुक्याला कपाशीने मोठा आधार दिला असून, अनेक शेतकर्‍यांसाठी तर हे मुख्य पीक बनले आहे. विशेषता अवर्षणप्रवण उत्तरपूर्व भागात कांद्याबरोबरच कपाशी देखील नगदी हक्काचे पीक बनले असून, अनेकांच्या अर्थकारणाला आकार दिला आहे. राजापूर, ममदापूर, भारम पट्ट्यातील ओस पडणार्‍या डोंगराळ जमिनीसुद्धा कपाशीचे पीक घ्यायला ल्यागल्यापासून लाखोंचे उत्पन्न देऊ लागल्या आहेत.

तालुक्यात या वर्षी २० हजार १६१ शेतकर्‍यांनी तब्बल पंधरा हजार ४५ हेक्टरमध्ये कपाशीचे पीक घेतले होते. मागील वर्षी कपाशीला क्विंटलला सहा हजारांपर्यंत भाव मिळाल्यापश चांगले पैसे हाती लागले म्हणून यंदा देखील कांद्यासोबत कपाशीची लागवड वाढली होती. पावसाने अनियमितता दाखविल्याने टंचाईची स्थिती निर्माण झाली, त्यावेळी उपलब्ध पाणी ठिबकद्वारे देऊन शेतकर्‍यांनी अडचणीतही कपाशीचे जतन केले होते. यामुळे कपाशीला पस्तीस ते पन्नास पर्यंत बोंडे देखील लागल्याने समाधानकारक परिस्थिती होती. परंतु, उत्पन्नाची आशा असतानाच गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आणि शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणीच पळाले. पहिल्या टप्प्यातील कापसाची बोंडे व्यवस्थित फुलली मात्र दुसर्‍या टप्प्यात बोंडआळीचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक बोंडे खराब झाल्याने कापसाचे निम्मे उत्पन्न हाती आले नाही. परिणामी शेतकर्‍यांचे २५ ते ३५ कोटीहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

कृषी व महसुल विभागाने शासनाच्या सूचनेनुसार या सर्व नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले असून, तालुक्यातील सर्व क्षेत्र तीस टक्क्यांपेक्षा अधिक बाधित असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. यामुळे जिरायती कपाशीचे १३ हजार ७४८ हेक्टरवरील नुकसानीच्या पंचनाम्याचा हिशोबाने हेक्टरी ६ हजार ८०० रुपयांच्या मदतीच्या निकषांने ९ कोटी ३३ लाख ८७ हजारांचे नुकसान नोंदवले गेले आहे.  जाहिर झालेली मदत संबधीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर थेट वर्ग कण्यात येणार असून या रकमेतून कोणत्याही बँकेने कोणतीही वसूली करुनये, अशा स्पष्ट सूचनाही शासनआदेशात देण्यात आल्या आहेत.

तालुक्यात लागवड झालेल्या १३ हजार ७४८ क्षेत्रातील कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले होते. सर्वत्र बोंडआळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यानुसार २० हजार १५९ शेतकर्‍यांच्या जिरायती क्षेत्रातील नुकसानीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. शासनाने नुकसानग्रस्तांना भरपाई जाहिर केली आहे.
- अभय फलके, तालुका कृषी अधिकारी, येवला

Web Title: marathi news farmers cotton crops Loss compensation