मंडपाच्या गुदामाला आग; ५० लाखांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

जुने नाशिक - भारतनगर भागातील बागवान मंडपाच्या गुदामास गुरुवारी (ता. १५) आग लागली. आगीत गुदामासह परिसरातील सात घरे खाक झाली. त्यातील एका कुटुंबाच्या घरात १० एप्रिलला विवाह असल्याने त्यांनी खरेदी केलेले साहित्य खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

जुने नाशिक - भारतनगर भागातील बागवान मंडपाच्या गुदामास गुरुवारी (ता. १५) आग लागली. आगीत गुदामासह परिसरातील सात घरे खाक झाली. त्यातील एका कुटुंबाच्या घरात १० एप्रिलला विवाह असल्याने त्यांनी खरेदी केलेले साहित्य खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

एजाज पापामियाँ बागवान यांचे भारतनगर भागात मंडपाचे पत्र्यांचे मोठे गुदाम आहे. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास गुदामात काम करणारे सर्व कर्मचारी जेवण करण्यासाठी गेले. त्यानंतर १५ मिनिटांत बागवान यांना त्यांच्या गुदामाला आग लागल्याची माहिती मिळाली. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर काही मिनिटांत बंब घटनास्थळी दाखल झाले. गुदामाच्या तिन्ही बाजूने पाण्याचा मारा करत आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. परिसरातील युवकांनी गुदामाच्या शेजारील घरावरून जात गुदामाचे पत्रे तोडून पाण्याचा मारा करण्यासाठी मोकळी जागा करून दिली. 

अग्निशमन मुख्यालय, पंचवटी, नाशिक रोड, देवाळाली कॅम्प, सिडको अशा पाच बंबांच्या सहाय्याने तसेच चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले. आगीत गुदामातील गाद्या, कारपेट, मंडप कपडा, टेबल खुर्ची, सजावटीचे साहित्य, लोखंडी फ्रेम, मंडप प्रवेशद्वारचे साहित्य तसेच गुदामस लागून असलेली सहा- सात घरे, त्यातील घरगुती साहित्य पूर्णपणे जळून सुमारे ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले. 

लग्नाचे साहित्य खाक
आगीत गफूर शाह यांचे घर जळून गेले. त्यांच्या मुलीचा १० एप्रिलला विवाह आहे. विवाहास काही दिवस शिल्लक असल्याने गफूर यांनी नुकतीच खरेदी केली होती. नवीन कपड्यांसह विविध वस्तूंचा त्यात समावेश होता. त्या सर्व वस्तू आगीत खाक झाल्या. या घटनेमुळे शाह कुटुंब पूर्णपणे खचून गेले आहे.

Web Title: marathi news fire nashik