परदेशी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नाशिक : परदेशामध्ये चांगल्या वेतनाच्या नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या तिघांना खास पोलीसांनी नालासोपाऱ्यातून अटक केली आहे. संशयितांमध्ये दोघे नायजेरियन असून त्यांच्याकडील बॅंकेच्या तपशिलामध्ये नाशिकमधून अनेकांची फसवणूक झाली असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे ज्यांची फसवणूक झाली, त्यांनी नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

    नाशिक सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील खार पोलीस ठाण्याकडे गेल्या 13 मार्च रोजी श्रीमती आपोलेनिया अर्नाण्डीस यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांनी फेसबुक यावर बनावट खाते उघडून श्रीमती अर्नाण्डिस यांच्याशी ओळख वाढविली आणि त्यांना परदेशी नोकरीचे आमिष दाखविले.

त्यांना बॅंक खात्यावर वारंवार पैसे टाकण्यास सांगून 2 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलिसांनी गेल्या 10 एप्रिल रोजी नालासोपारा येथून गंडा घालणारे तिघे संशयित शोएब कुरेशी (24), पास्कल झुम्बे (21), सॅनडे मेजे (22, तिघे रा. नालासोपारा) यांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी 7 एटीएम कार्ड, 11 मोबाईल सिमकार्ड, 1 लॅपटॉप, 2 राऊटर, 4 मोबाईल, 3 हजार रुपये रोख व बॅंकेच्या पावत्या असा ऐवज जप्त केला आहे. 

 या  तपासामध्ये संशयितांच्या बॅंकेच्या तपशिलामध्ये नाशिकमधील 15 जणांचीही फेसबुकच्या माध्यमातून फसवणूक झाली असावी असा अंदाज आहे. त्यामुळे नाशिक सायबर पोलिसांनी याप्रकरणी आवाहन केले असून, ज्यांची फेसबुकच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ सायबर पोलीसांशी संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. 
 
Web Title: marathi news foreigner fraud