तरुणांना फसवणारे अद्यापही मोकाटच 

आनन शिंपी
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पोलिसांनी तक्रारीची दखलच घेतली नाही. त्यामुळेच फसवणूक करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले व ते आजही फरार त्यामुळेच आहेत, असा आरोप फसवणूक झालेल्या तरुणांच्या पालकांनी केला आहे. 

चाळीसगाव - सैन्यात नोकरीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक करणाऱ्या सुभेदाराचा प्रकार उघडकीस येण्यापूर्वी असाच काहीसा प्रकार तालुक्‍यातील कळमडूसह परिसरातील तरुणांबाबत घडला होता. या प्रकाराची पोलिसात तक्रार करण्यासाठी काही तरुण मेहुणबारे पोलिस ठाण्यातही गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखलच घेतली नाही. त्यामुळेच फसवणूक करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले व ते आजही फरार त्यामुळेच आहेत, असा आरोप फसवणूक झालेल्या तरुणांच्या पालकांनी केला आहे. 

पाचोऱ्यातील प्रकार उघडकीस आल्यानंतर कळमडू (ता. चाळीसगाव) येथील समाधान केदारसह इतर सात ते आठ जणांनी काल (26 फेब्रुवारी) जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. फसवणूक झालेल्या तरुणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना सुरवातीला कळमडू येथील सुधीर भिल याने नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील संजय अडकमोल याची भेट घालून दिली. त्यानुसार, त्याने सैन्य दलात भरती करण्याचे सांगून प्रत्येकी दोन ते चार लाख रुपये घेतले. काही तरुणांना आसाम, दिल्ली, हैदराबादलाही तो घेऊन गेला. सर्वांना नवीन ट्रॅक सूटही दिले. विशेष म्हणजे, काहींना बनावट नियुक्तीपत्रही दिले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणांसह त्यांच्या पालकांनी अडकमोलकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. आपल्यावरचा विश्‍वास उडू नये म्हणून अडकमोल याने काहींना धनादेशही दिले. मात्र, ज्या तारखेचे ते धनादेश होते, त्या दिवशी त्याच्या खात्यात शिल्लक नसल्याने ते 'बाऊन्स' झाले. त्यानंतर काही तरुणांना प्रत्येकी 20 हजार रुपये त्याने परत केले आणि घडलेल्या प्रकाराबाबत कुठे तक्रार केली तर उलट तुमच्यावरच गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. दिलेल्या रकमेपैकी 20 हजार परत मिळाल्यामुळे आज ना उद्या आपले उर्वरित पैसे परत मिळतील, अशी आशा होती. मात्र, आता ही आशा पूर्णपणे मावळल्याचे दिसत असल्याने फसवणूक झालेले तरुण न्याय मिळावा म्हणून पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहेत. 

अप्पर पोलिस अधिक्षकांची भेट 
झालेल्या काही तरुणांनी चाळीसगावला अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची 14 फेब्रुवारीला भेट घेतली होती. त्यांनाही फसवणूक झालेला प्रकार तरुणांनी सांगितला. मात्र, त्यांनी दोन दिवसांनी येण्यास सांगितले. त्यानुसार, दोन दिवसांनी तरुण पुन्हा गेले. श्री. बच्छाव यांनी मेहुणबारे पोलिसांना कळविले देखील. मात्र, तरीही मेहुणबारे पोलिसांनी या तरुणांची दखल घेतली नाही. आता पाचोरा पोलिस ठाण्यात सुभेदाराच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा व या तरुणांनी पोलिस अधीक्षकांना काल दिलेल्या निवेदनामुळे मेहुणबारे पोलिसांनी या तरुणांशी संपर्क साधल्याचे समजते. ज्या दोघा संशयितांनी या तरुणांची फसवणूक केली आहे, त्यांचे श्रीरामपूर येथील एका अकॅडमीचालकाशी संबंध आहे. शिवाय डांभुर्णी (ता. यावल) येथेही एका नातेवाइकाच्या मदताने परिसरातील तरुणांची सुधीर भिल व संजय अडकमोल यांनी अशीच फसवणूक केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या दोघांची कसून चौकशी करावी व त्यांच्याकडून आमचा कष्टाचा पैसा परत मिळवून द्यावा, अशी आर्त मागणी या तरुणांनी केली आहे.

Web Title: marathi news fraud young boys job bait police