खरे श्रेय ऍड. सूर्यवंशी यांचेच! 

खरे श्रेय ऍड. सूर्यवंशी यांचेच! 

धुळे ः अनेक आर्थिक प्रलोभने, दबावाला बळी न पडता गरिबांसाठी न्यायाच्या संघर्षाने लढा देणारे विशेष सरकारी वकील (कै.) ऍड. निर्मलकुमार सूर्यवंशी उपाख्य "एनडी नाना' यांच्यामुळे जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी ऐतिहासिक निकाल लागला. त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. प्रवीण चव्हाण यांची मोलाची साथ लाभली. त्यांच्या परिश्रमाचे तर हे चीज आहेच. पण खऱ्या अर्थाने ऍड. सूर्यवंशी यांना या ऐतिहासिक निकालाचे श्रेय जाते, असे सांगत वकिलांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना आज उजाळा दिला. 
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाला कायदेशीर पटलावर ऍड. सूर्यवंशी यांनी खरी दिशा दिली. तपासाधिकाऱ्यांनी ऍड. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज केले. मुद्देसूद व प्रभावी मांडणीमुळे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आरोपींना त्यामुळे बराच काळ जामीन मिळू शकला नाही. प्रकृती बरी नसतानाही केवळ गरिबांच्या न्यायासाठी ते लढत होते. अनेक आर्थिक प्रलोभने नाकारून त्यांनी न्याय हक्कासह सत्याची कास कायम ठेवली. त्यांचा प्रभावी युक्तिवाद, उलटतपासणीतील कौशल्य, घोटाळ्यातील खरे सूत्रधार कोण आणि सह्याजीरावांचे त्यामुळे झालेले नुकसान याविषयी ते परखडपणे बोलत. वास्तव, वस्तुनिष्ठ आणि खरी भूमिका ते न्यायालयात कामकाजावेळी मांडत असताना ऍड. सूर्यवंशी यांच्याविषयी आरोपींनाही आदर निर्माण झाला. त्यांच्याकडे खटल्याचे कामकाज आल्याने न्यायच मिळेल, अशी प्रतिक्रिया जनतेत उमटत होती. त्याप्रमाणे खटल्याचा आज ऐतिहासिक निकाल लागू शकला. त्यांच्या या आठवणी कामकाजावेळी डोळ्यासमोर तराळत होत्या, अशी भावना न्यायालयात अनेक वकील, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली. या खटल्याचा ऐतिहासिक निकाल हीच त्यांना अखेरची खरी श्रद्धांजली ठरल्याच्या प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या. तसेच सोशल मीडियावर असंख्य मान्यवरांनी या स्वरूपात श्रद्धांजली वाहिली. 

नरेंद्र पाटलांचा लढा 
जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी एकांगी शेवटपर्यंत लढा देणारे जळगावचे सामाजिक कार्यकर्ते (कै.) नरेंद्र पाटील यांच्याही आठवणींना आज अनेक मान्यवरांनी उजाळा दिला. या प्रकरणात ते त्रयस्थ म्हणून न्यायालयात उभे राहत होते. गरिबांच्या न्यायासाठी लढत होते. त्यांच्या लढ्याला ऐतिहासिक निकालामुळे यश लाभल्याची प्रतिक्रिया विविध क्षेत्रांतून उमटली. 
 
कुटुंबीय, नातेवाइकांची गर्दी 
जिल्हा न्यायालयात निकालावेळी माजी मंत्री सुरेश जैन यांच्यासह सर्व आरोपींचे नातेवाईक, कुटुंबीयांनी गर्दी केली होती. दिवसरात्र काम चालल्याने त्यांनी आरोपींसाठी जेवणाची व्यवस्था केली. महिला आरोपींना निकालानंतर रडूच कोसळले. तेव्हा इतर आरोपी त्यांचे सांत्वन करत होते. महिला आरोपी दूरध्वनीद्वारे अन्य नातलगांशी संवाद साधत होते. रुपया घेतलेला नसताना आजचा दिवस पाहावा लागला, अशी प्रतिक्रिया ते एकमेकांना देत होते. न्यायालयाने सरासरी 49 ते 51 आरोपींना एकूण तब्बल 188 कोटी 99 लाखांचा दंड ठोठावला आहे. व्याधीग्रस्त पुष्पा पाटील यांचा जामीन अर्ज दाखल झाला. यात एक महिला आरोपी फरार व सापडत नसल्याने तिचा खटला चाललेला नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com