Vidhan sabha : उत्तर महाराष्ट्रात युतीला 40 जागा मिळणारच : जलसंपदामंत्री गिरीश महाजन  

Girish_Mahajan
Girish_Mahajan

गेल्या निवडणुकीत जनतेने विश्‍वासाने भाजपला पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून निवडून दिले. शिवसेनेशी युती करून सरकार स्थापन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत राज्यात शेतकरीहिताचे, तसेच व्यापारी व उद्योगवाढीचे, युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देणारे, रस्ते, सिंचन विकासाचे निर्णय घेतले. त्यामुळे जनतेचा आमच्या सरकारवर विश्‍वास अधिक वाढला आहे. त्यामुळे यावेळी राज्यात आमचे सरकार येईलच. येत्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात भाजप- शिवसेना महायुतीला 47 पैकी 40 जागा मिळतील, असा विश्‍वास जलसंपदामंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 


प्रश्‍न : युतीला पुन्हा यश मिळण्याच्या दाव्याचे गमक काय? 
उत्तर : आम्ही गेल्या पाच वर्षांत केलेली विकासाची कामे हेच आमच्या पुन्हा मिळणाऱ्या यशाचे गमक आहे. विरोधक आमच्या निष्क्रियतेचा आरोप करीत आहे; परंतु आम्ही केलेल्या शेती, रस्ते, सिंचन, आरोग्य, विकासाच्या कामांचा आरसा समोर दिसत आहे. याच विकासकामांच्या बळावर जनता आम्हाला राज्यात सरकारच्या माध्यमातून काम करण्याची पुन्हा संधी देईल. 

प्रश्‍न : उत्तर महाराष्ट्रात मोठ्या यशाचा तुमचा दावा आहे? 
उत्तर : होय. निश्‍चितच उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, नगर महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत. आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्‍वास आहे. याशिवाय, उत्तर महाराष्ट्रात सिंचनाची कामेही आम्ही सुरू केली आहेत. जळगाव येथे "मेडिकल हब'ची उभारणी सुरू असून, ती पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात महायुतीला 47 पैकी 40 जागा मिळतीलच, याची आम्हाला खात्री आहे. 

प्रश्‍न ः खानदेश महायुतीचा बालेकिल्ला होणार? 
उत्तर : होणार काय, आहेच. नंदुरबार, धुळे, जळगाव या खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांत विरोधक समोर दिसतच नाहीत. या ठिकाणी एकूण वीस जागा आहेत. त्यामुळे 17 जागांवर आम्ही हमखास विजयी होऊच, याचा आम्हाला ठाम विश्‍वास आहे. 

प्रश्‍न : भाजपच्या बंडखोरावर कारवाई कधी? 
उत्तर : विधानसभेत ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांच्यावर भाजपतर्फे कारवाई करण्यात येईल. त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू. 

प्रश्‍न : "जामनेर'मधून तुमचा मोठ्या मताधिक्‍याचा दावा आहे? 
उत्तर : होय, निश्‍चितच. आपण गेल्या पंचवीस वर्षांपासून त्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. प्रत्येक गावातील मतदारांशी आपली वैयक्तिक ओळख आहे. त्याशिवाय, मतदारसंघात आपण कामे केली आहेत. त्यामुळे जनतेचा विश्‍वास आहे. त्याच बळावर आपल्याला यावेळी मोठे मताधिक्‍य मिळणार, याची खात्री आहे. 

प्रश्‍न ः खानदेशातील सिंचनाच्या अनुशेषाचे काय? 
उत्तर : खानदेशातील सर्व प्रकल्पांना आपण निधी मंजूर केला आहे. तो उपलब्धही करून दिला आहे. त्याची कामेही आता सुरू झाली आहेत. वाघूर धरणातून थेट शेतात सिंचनासाठी पाणी देण्यासाठी बंदिस्त पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू झाले आहे. पाडळसरे धरणाच्या कामासाठी आवश्‍यक तो निधी उपलब्ध करण्यात आला आहे. शेळगाव बॅरेजचे काम सुरू आहे. तेही लवकरच पूर्ण होईल. येत्या दोन वर्षांत सर्व प्रकल्प पूर्ण होतील आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे अनुशेष शिल्लक राहणार नाही. 

प्रश्‍न : जामनेरच्या "टेक्‍स्टाइल्स पार्क'चे काय? 
उत्तर : "टेक्‍स्टाइल्स पार्क'साठी जागा घेण्यात आली आहे. त्याच्या कामाचे भूमिपूजन लवकरच करण्यात येईल. येत्या पाच वर्षांत ते कार्यान्वित होईल. त्यामुळे खानदेशातील शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेल व मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल. 

मुक्ताईनगर भाजपच जिंकणार! 
मुक्ताईनगर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार ऍड. रोहिणी खडसे उमेदवार आहेत. तेथे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी बंडखोरी करून उमेदवारी केली आहे. या मतदारसंघातील यशाबाबत जलसंपदामंत्री महाजन म्हणाले, की मुक्ताईनगर मतदारसंघाची जागा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची आहे. तेथे आमच्या उमेदवार ऍड. रोहिणी खडसे विजयी होणार असून, आमचा विजय निश्‍चित असल्याने त्या जागेची अजिबात चिंता नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com