गुंडांनी धमकावल्याने मुलीने घेतले फिनाईल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

जळगाव : आई-वडील कामावर गेले असताना काही मद्यपी गुंडांनी घरात एकटी असलेल्या तेरा वर्षीय मुलीला शिवीगाळ करून तुझ्या बापाला मारून टाकेल, अशी धमकी दिल्याची घटना आज दुपारी अडीचच्या सुमारास घडली. पीडित मुलीने धास्तावून "फिनाईल' प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गल्लीतील महिलेने तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर या गुंडांनी परत रुग्णालयात येऊन शस्त्रांचा धाक दाखवत पोलिसांत तक्रार न करण्यासाठी धमकावल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. यातील एक जण खुनाच्या गुन्ह्यात संशयित असल्याची माहिती तेथील रहिवाशांनी दिली. 

तुकारामवाडी, ईश्‍वर कॉलनी, टेलिफोननगरपासून ते थेट लक्ष्मीनगरपर्यंतच्या परिसरात एका खास टोळीची दहशत आहे. या टोळीचा म्होरक्‍या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असून, त्याच्याच टोळीशी संबंधित असलेल्या तिघांनी काही दिवसांपूर्वीच इस्टेट एजंट असलेल्या तरुणाचा खून केला होता. खुनातील संशयित आणि टोळीच्या दुसऱ्या फळीतील संशयितही अटकेत असून, त्यांचेच "पंटर' आता तुकारामवाडीत दहशत माजवत आहेत. महिला महाविद्यालयात आठवीत शिकणाऱ्या पिंकीचे (नाव काल्पनिक) वडील वायरमनची कामे करतात तर आई देखील मोलमजुरीला जाते. कुटुंबात पाच वर्षांचा लहान भाऊ असून, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. आई-वडील कामावर असताना पिंकी घरी एकटीच होती. दुपारी अडीचच्या सुमारास संदीप वाणी ऊर्फ "रामजाने' हा दारूच्या नशेत पिंकीच्या घरी आला..तुझा बाप कुठे गेला..फोन करून बोलावं आता.. त्याला मारीन', मी असे म्हणत पिंकीला धमकावल्याने धास्तावलेल्या मुलीने घरात जाऊन "फिनाईल' प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गल्लीतील चंदा ईश्‍वर वाणी यांनी बेशुद्धावस्थेत मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर ही माहिती दिली. 

नेहमीचाच त्रास 
मुलीचे वडील स्वभावाने, परिस्थितीनेही गरीब असल्याने त्यांना अनेक दिवसांपासून या गुंडाचा त्रास आहे. गल्लीत येता-जाता संदीप वाणी, विक्की झाल्टे व त्याच्या सोबतचे गुंड शिवीगाळ करतात. तीन दिवसांपूर्वीच मध्यरात्री पीडित मुलीच्या घरी येऊन तिच्या आई-वडिलांना शिवीगाळ दमदाटी केल्याचा प्रकार घडला होता. या कुटुंबाचे जगणे मुश्‍कील झाल्याने तेरावर्षीय मुलीने टोकाचा निर्णय घेतल्याचे पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले. 

पोलिसांची भीती नाहीच 
मुलगी जिल्हा रुग्णालयात दाखल असताना पोलिसांत तक्रार करू नये, म्हणून रुग्णालयात आणणाऱ्या चंदा वाणी यांनाच शिवीगाळ व दमदाटी करून तलवारीने चिरून टाकण्याची धमकी देण्यात आली. पीडिता सांगत असलेल्या संशयितांनी गेल्या वर्षी दारूच्या नशेतील परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून परिसरात या टोळीचा दबदबा वाढला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news girl finail drink