मुलींच्या घटत्या जन्मदरातून  होतेय सामाजिक अभिसरण 

residentional photo
residentional photo

निमोण : राज्यभर मुलींचे घटते प्रमाण आता सामाजिक दरी कमी करण्यासाठीचे कारण ठरत आहे. आदिवासी समाजातील मुली गैरआदिवासी कुटुंबीयांच्या उबरठ्यावरील धान्याचं माप ओलांडत असल्याने हे सामाजिक दरी कमी होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. 

  मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत असल्याची ओरड सर्वत्रच ऐकावयास मिळते. त्यातच बहुजन समाजातील शेतकऱ्यांची मुले उच्चशिक्षण घेऊनही बेरोजगार आहेत. त्यातील अनेक सुशिक्षित तरुण शेवटी शेतीलाच प्राधान्य देऊ लागले. पण "शेतकरी नवरा नको गं बाई' म्हणत मुली मात्र त्यांना लग्नासाठी नकार देत आहेत. परिणामी शेतीला मुली नाही अन्‌ मुलांना काम नाही, असे काहीसे चित्र उभे राहिल्याने चिंता व्यक्त होत होती. त्यावर उपाय म्हणून का होईना, पण आता फक्त रोटी व्यवहार करणारे समाजदेखील बेटी व्यवहार करू लागले अन्‌ समस्येची जागा सामाजिक अनुसरणाने घेतली. 

क्रांतिकारी निर्णय 
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, दिंडोरी व कळवण या तालुक्‍यांतील अनेक आदिवासी मुली सध्या चांदवड, देवळा, निफाड, नांदगाव, येवला या तालुक्‍यांत बहुजन समाजातील मुलांबरोबर गुण्यागोविंदाने नांदत आहेत. या चळवळीला साधारण दोन वर्षांपूर्वी निमोण (ता. चांदवड) येथील माजी सरपंच गयाबाई गवारे यांनी सुरवात केली. त्यांचा शेतकरी मुलगा योगेशला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. आपल्याकडे शेती आहे, समाजात प्रतिष्ठा आहे, तरीही मुलींच्या घटत्या संख्येमुळे सून मिळत नाही, या विचाराने त्यांना अस्वस्थ केले. त्यातूनच त्यांनी आदिवासी भागातील मुलगी घरात सून म्हणून आणायचा क्रांतिकारी निर्णय घेतला अन्‌ वधू संशोधन सुरू केले. काही दिवसांतच धोंडाळपाडा ननाशी (ता. दिंडोरी) येथील मनोहर भोये या आदिवासी कुटुंबात त्यांचा शोध थांबला. सर्व सोपस्कार पार पाडून त्यांनी श्री. भोये यांची दहावीपर्यंत शिकलेली ललिता हिला सून म्हणून आणायचे निश्‍चित केले. धोंडाळपाडा या आदिवासी पाड्यावरच योगेश अन्‌ ललिताचे लग्न झाले. 

सामाजिक अभिसरणाची नांदी 
23 नोव्हेंबर 2017 ला आदिवासी समाजातील ललिताने शेकडो नातेवाइकांच्या उपस्थितीत सन्मानाने गैरआदिवासी कुटुंबाच्या उंबरठ्यावरील माप ओलांडले. ही घटना या भागात खऱ्या अर्थाने सामाजिक अभिसरणाची नांदी ठरली. त्यानंतर या भागातील अनेक बहुजन कुटुंबांत आदिवासी मुली गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यातून दोन समाजांमधील पोकळी भरून निघते आहे. 
 
माय-लेकीचं नातं 
धोंडाळपाड्याची ललिता सध्या निमोणच्या गवारे कुटुंबात अतिशय आनंदाने नांदत आहे. विशेषत: माजी सरपंच गयाबाई अन्‌ ललिता यांचं नातं तर माय-लेकीगत असल्याचं ललिता सांगते. त्यांच्या संसारवेलीवर एक तीन महिन्यांचं गोंडस फूलदेखील उमललंय. त्यामुळे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन आणि मुलींच्या घटत्या संख्येला उत्तम पर्याय शोधण्याचे हे एक चांगले उदाहरण ठरले आहे. 

वाढती बेरोजगारी, शेतीला आलेली अवकळा यामुळे ग्रामीण तरुणांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. शेतकऱ्याच्या मुलींनाही आता शेतकरी नवरा नको आहे. लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून सामाजिक प्रतिष्ठेला मूठमाती देऊन एक मोठा समाज आदिवासी भागातील मुलींशी लग्न करून नुसता घरोबा करीत नाहीये, तर सामाजिक एकोपाही साधत आहे. ही लक्षणीय बाब आहे. येणाऱ्या नव्या युगाची ही नेटकी चाहूल आहे. 
विष्णू थोरे, कवी व गीतकार, चांदवड 

बहुजन समाजातील मुलींच्या घटत्या संख्येमुळे विषमता निर्माण झाली. यातून आदिवासी मुली आपल्या कुटुंबात सून म्हणून आणणे, ही दोन समाजातील दरी कमी करण्यासाठी चांगली गोष्ट आहे. 
- गणेश निंबाळकर, मराठा समाज कार्यकर्ता व 
जिल्हा उपाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना 
 
सन 2018-19 मधील जन्मदरावर दृष्टिक्षेप 

तालुका मुले मुली लिंग गुणोत्तर 

दिंडोरी 2,751 2,729 992 
इगतपुरी 2,415 2,317 959 
कळवण 2,359 2,379 1,008 
मालेगाव 3,582 3,554 992 
नांदगाव 1,919 1,892 986 
नाशिक 2,009 2,079 1,031 
निफाड 3,539 3,595 959 
पेठ 1,210 1,065 880 
सिन्नर 2,218 2,184 985 
सुरगाणा 1,839 1,744 948 
त्र्यंबकेश्‍वर 1,363 1,697 963 
येवला 1,577 1,517 962 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com