गोदावरी गौरव'द्वारे आज कृतज्ञतेचा नमस्कार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

नाशिकः कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. 10) सायंकाळी सहाला रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. 

नाशिकः कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्काराचे वितरण शनिवारी (ता. 10) सायंकाळी सहाला रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड येथे होणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होईल. 
गोदावरी गौरव म्हणजे विशिष्ट क्षेत्रात असामान्य कामगिरी करून समाजाचे सांस्कृतिक जीवन संपन्न करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी लोकसेवा, ज्ञान, शिल्प, संगीत, चित्रपट-नाट्य, तसेच साहस अशा सहा क्षेत्रांतील मान्यवरांना यंदाचा गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. 21 हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 
पुरस्कारार्थींमध्ये मेळघाटमध्ये समाजसेवा करणारे डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे (लोकसेवा), मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख (ज्ञान), ज्येष्ठ चित्रकार सुभाष अवचट (चित्र-शिल्प), पं. सत्यशील देशपांडे (संगीत), ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (चित्रपट-नाट्य), मुंबईच्या कमला मिलमध्ये लागलेल्या आगीतून नागरिकांना वाचविणारे सुदर्शन शिंदे, महेश साबळे (साहस) यांचा समावेश आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले. 
आतापर्यंत 13 पुरस्कार सोहळे 
कविवर्य कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून 1992 पासून दर दोन वर्षांनी गोदावरी गौरव हे राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांना तात्यासाहेब "कृतज्ञतेचा नमस्कार' असे संबोधत असत. पहिल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार, क्रीडापटू विजय हजारे, गंगूबाई हनगल, ज्येष्ठ शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना गौरविण्यात आले होते. 1992 पासून आतापर्यंत 13 पुरस्कार सोहळे नाशिकला झाले आहेत. यात लोकसेवा, ज्ञान, चित्र-शिल्प, संगीत क्षेत्रातील 76 मान्यवरांना आतापर्यंत गौरविले आहे. 
 

Web Title: marathi news godavari gaurav