#BattleForNashik गोडसेंची उमेदवारी हे ठाकरे-भुजबळांचे "सेटिंग' 

live
live

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून कोकाटे किंवा करंजकर हे उमेदवार छगन भुजबळ यांना परवडणारे नसल्याचे अभ्यासाअंती लक्षात आल्याने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी "सेटिंग' करून मतदारांची नाराजी असलेले हेमंत गोडसे यांची उमेदवारी ठरवली, असा आरोप अपक्ष उमेदवार ऍड. माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी (ता. 9) केला. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविताना ऍड. कोकाटे यांनी भाजपवर मात्र फारशी टीका केली नाही. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरताना कोकाटे यांनी "मैं भी क्‍या चीज हूँ' हे भाजपला कळेलच, असा गर्भित इशारा दिला. 

येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर मंगळवारी कोकाटे समर्थकांचा मेळावा झाला. या निमित्ताने कोकाटे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याने नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले. या वेळी भूमिका मांडताना ते म्हणाले, की कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी उमेदवारी करत आहे. छगन भुजबळ यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने त्यांचा जातीय आराखडा नाशिकमधील समाजहिताचा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे भुजबळांसमोर काहीच चालत नसल्याने तक्रारी होऊनही समीर यांना उमेदवारी दिली.

पवारांनी भुजबळांना दिवाबत्तीसाठी नाशिक आंदण दिल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. कोकाटे किंवा शिवसेनेचे विजय करंजकर हे उमेदवार परवडणारे नसल्याने उद्धव ठाकरे यांच्याशी सेटिंग करून भुजबळांनी शिवसेनेचा उमेदवार ठरविला. त्यामुळे गोडसे हे छगन भुजबळांचे उमेदवार आहेत. ठाकरे-भुजबळांनी नाशिकला गृहीत धरल्याचा हा परिणाम असून, दोघेही जातीयवादाचे रूप घेऊन नाशिकमध्ये अवतरल्याने ही भूमिका समाजहिताची नाही. भुजबळांनी ओबीसींच्या नावाने मते मागितली; परंतु त्यांनी कुठल्या ओबीसीचे भले केले हे सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले. माजी आमदार कल्याणराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, बंडूनाना भाबड, राजेंद्र भोसले, नगरसेवक मुशीर सय्यद, माजी नगरसेवक प्रताप मेहेरोलिया आदींची भाषणे झाली. 

कोकाटेंचा हल्लाबोल 
* मराठा मोर्चाला "मुका मोर्चा' संबोधणाऱ्या शिवसेनेला मराठ्यांचे मतविभाजन होईल हे सांगण्याचा अधिकार नाही 
* भुजबळ, गोडसे या दोन्ही खासदारांनी नाशिकचे शेतकरी, कामगार देशोधडीला लावले 
* भाजीविक्रेते भुजबळ 50 हजार कोटींचे मालक कसे? 
* भुजबळांच्या नाशिकमध्ये हजारो एकर जमिनी 
* मुंबईकरांना घरपट्टी माफ करणाऱ्या शिवसेनेने शेतीकर्ज माफ का केले नाही? 
* धमक असेल तर सरकारने अटक करून दाखवावी 
* संकटमोचक गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतील 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com