मनमाडला तीन हजारांची लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कक्ष सहाय्यक जाळ्यात

अमोल खरे; सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

मनमाड २२ - गर्भवती महिलेचे सिझरद्वारे प्रसूती केल्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून तीन हजाराची लाच घेतांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल सुभाषराव पोतदार व कक्ष सहाय्यक प्रविण नीलकंठ राठोड या दोघांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहाथ पकडले. या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. यानिमित्ताने उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार  चव्हाट्यावर आला आहे.

                   तक्रारदार यांची बहीण गर्भवती असल्याने प्रसुती वेदना सुरू झाल्यावर प्रसूतीसाठी  तिला मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या महिलेची नैसर्गिक प्रसूती होत नसल्याने तक्रारदाराच्या बहिणीचे  सिझरद्वारे प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिझरनंतर त्याच्या मोबदल्यात याच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असलेले  डॉ. सुनिल सुभाषराव पोतदार, ( वय- ४५, व्यवसाय- नोकरी) याने तक्रारदाराकडे ४ हजार रुपयांची लाच मागितली..तडजोडीअंती ३ हजार रुपये लाच देण्याचं निश्चित झालं. तक्रारदार हा गरीब हात मजूर असल्याने इतके पैसे नव्हते. त्याला ही रक्कम लाच म्हणून देणं परवडणारे नव्हते, यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारदार  आज ३ हजार रुपये घेऊन रुग्णालयात गेले. तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उपजिल्हा रुग्णालयात सापळा लावला. डॉ पोतदार याचा कक्ष सहायक प्रविण नीलकंठ राठोड ( वय- ३३, व्यवसाय- नोकरी)  याच्या हस्ते ३ हजार रुपयांची लाच घेतल्याचा ‘सिग्नल’ मिळताच पथकाने या दोघांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम, जयपाल अहिरराव, वैभव देशमुख,  नितीन कराड, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने कारवाई केली

    मनमाड उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. मात्र, नैसर्गिक प्रसुती शक्य नसल्यास कराव्या लागणाऱ्या 
सिझेरियनसाठी तसेच इतर उपचारासाठी या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळत असल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. अखेर आज सिध्द झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news GROUND doctor accused bribe