# GROUND REPORT अंघोळीची "गोळी' घेऊन राजकीय चर्चेचे रवंथ करणारे जंक्‍शन 

संपत देवगिरे, नाशिक
सोमवार, 8 एप्रिल 2019

एकदा नव्हे, दोनदा नव्हे तीनदा एकाच पक्षाच्या खासदाराला मोठी आघाडी देणारे गाव कोणते? त्याचे उत्तर आहे मनमाड. या मनमाडमध्ये रात्र वाढू लागली की लोक मोकळे होतात. चर्चा करू लागतात. त्यात निवडणूक हमखास असते. प्रत्येक चर्चेत पाणी असते. कारण येथे प्रत्यक्षात पाणी नसते. त्याने येथे एक भाषा विकसित झाली आहे. संकेत आहेत. सकाळी लोक विचारतात, "अंघोळीची गोळी घेतली का?' सर्व काही ठाकठीक असेल तर उत्तर येते, "आज दोन गोळ्या घेतल्या'. असे हे अंघोळीच्या गोळीवर चालणारे मनमाड जंक्‍शन. 

एकदा नव्हे, दोनदा नव्हे तीनदा एकाच पक्षाच्या खासदाराला मोठी आघाडी देणारे गाव कोणते? त्याचे उत्तर आहे मनमाड. या मनमाडमध्ये रात्र वाढू लागली की लोक मोकळे होतात. चर्चा करू लागतात. त्यात निवडणूक हमखास असते. प्रत्येक चर्चेत पाणी असते. कारण येथे प्रत्यक्षात पाणी नसते. त्याने येथे एक भाषा विकसित झाली आहे. संकेत आहेत. सकाळी लोक विचारतात, "अंघोळीची गोळी घेतली का?' सर्व काही ठाकठीक असेल तर उत्तर येते, "आज दोन गोळ्या घेतल्या'. असे हे अंघोळीच्या गोळीवर चालणारे मनमाड जंक्‍शन. 

... 
येथील एक कॉंग्रेस कार्यकर्ता भेटला. म्हणाला, नाव नका विचारू. पण आम्ही आमचा पक्ष विसरून व्यक्तिगत संपर्क म्हणून तीन वेळा आमच्या विरोधातील पक्षाला मतदान केले. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून घोषणा केली. प्रत्येक खासदार एक गाव दत्तक घेईल. वर्षभरात ते गाव सुजलाम सुफलाम होईल. मग दुसरे गाव दत्तक घेतले जाईल. अशी पाच वर्षांत हजारो गावे सुजलाम सुफलाम होतील. आम्हाला वाटले आता आमचे गाव दत्तक जाईल. आम्हालाही पाणी मिळेल. पण आज काय स्थिती आहे? निवडणुकीत पाणी सोडून सगळी चर्चा आहे. गेल्या निवडणुकीत स्वप्नात होतो. यंदा वास्तव कळले आहे. तीनदा निवडून येऊनही जे पाण्यावर चकार बोलतही नाहीत. 

या शहरात फेरफटका मारला असता त्याची दोन वैशिष्ट्ये दिसली. एक म्हणजे येथे प्रत्येक घरात प्रचंड पाणी साठवून ठेवलेले असते. प्रत्येक इमारतीच्या तळमजल्यावर वाहनांचे पार्किंग बाहेर, रस्त्यावर. इमारतीखाली प्रचंड आकाराच्या टाक्‍या असतात. चार टॅंकर रिते झाले तरी त्या इमारतीत कमीच पडतात. पण नागरिक ते पाणी अगदी ड्रिप इरिगेशन करावे तसे वापरतात. कारण पुन्हा पाणी कधी येईल याची शाश्‍वतीच नसते. आता निवडणुका सुरू आहेत. लोकांच्या चर्चेत विषय होते, पाणीदार नेतृत्व. पाणी देणारा नेता. पाण्यासाठी लढणारा कार्यकर्ता. पाण्याचे केव्हा दर्शन होईल याची वाट पाहणारा मतदार. सगळ्या चर्चेत, राजकारणात पाणी असते. अगदी खासदार म्हणतात पाणी देणारच. एक मंत्री म्हणाले, पाणी दिले नाही तर स्वतःचे नाव बदलून टाकीन. सगळे होते तेथेच आहेत. पाणी काही दिसले नाही. पालिकेच्या समोर एक पानपट्टी आहे. तिथला विडा छान रंगतो. पूर्वी येथे छम, छम आवाज कानी येत असे. तेव्हा अत्तराचा फाया अन्‌ तोंडात कोंबलेला विडा ही फॅशन होती. ते दिवस लयाला गेले. मात्र पानाचा विडा कायम आहे. रात्री चर्चा सुरू झाली की उत्तरोत्तर रंगते. लोक अगदी पहाटेपर्यंत राजकारणावर बोलतात. 

पाणीयोजनेसाठी अशोक परदेशी यांनी बरेच प्रयत्न, पाठपुरावा केल्याचे सांगितले. रेल्वे कामगार संघटनेचे नेते अनिल निरभवणे यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी काय काय केले याची जंत्रीच सांगितली. कॉंग्रेस नेते अहमद फारुखी, बाळासाहेब साळुंके यांनी शहराच्या, पालिकेच्या कामकाजात शिस्त, सुसूत्रता हवी याचा आग्रह सतत धरल्याचे सांगितले. विविध कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या चर्चेत आता एक भीती प्रकट होऊ लागली आहे. धास्ती आहे. भविष्यात काय होणार, याची चिंता आहे. कारण सकाळी उठले की लोक अंघोळीची गोळी घेतात. सगळे विसरून कामाला लागतात. मटणाची पार्टी, रंगीत, संगीत पार्टी मिळाली की मतदानाला जातात. रेल्वे जंक्‍शनच्या या गावात रोज लाख-दीड लाख लोक ये-जा करतात. मात्र जशा रेल्वे येतात, थांबतात, पुढे जातात तसाच येथे पाण्याचा विषय निघतो. चघळला जातो. मागे पडतो. असे आहे नळाच्या तोटीकडे आशाळभूत पाहत बसलेले तहानलेले मनमाड. 
... 
बॉक्‍स 
पालिकेचे काम असते, दिवाबत्ती, रस्ते, आरोग्य आणि पाणी. येथे पाणी नाही. त्यामुळे अंघोळ अपवादाने होते. टॉयलेटला लोक अतिशय कमी पाणी वापरतात. त्यामुळे विष्ठा फ्लश होत नाही. त्यातून दुर्गंधी होते. गटारी तुंबतात. सांडपाण्याचा प्रश्‍न तीव्र आहे. लोक आजारी पडू लागलेत. आजच हे शहर गटारी व दुर्गंधीचे बनले आहे. भविष्यात येथे आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल. यावर कोणीच बोलत नाही याची खंत वाटते, असे बाजार समितीचे माजी सभापती सतीश पाटील यांनी लक्ष वेधले. 

मनमाडसह नांदगाव तालुका सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे. पाण्याचा प्रश्‍न 50 वर्षांपासून भीषण आहे. सलग 15 वर्षे खासदारकी भोगणाऱ्या आणि दहा वर्षे आमदार राहणाऱ्या लोकप्रतिनिधींनी फक्त पोकळ आश्‍वासनेच जनतेला देत झुलवीत ठेवले. मांजरपाड्याचे 745 दशलक्ष घनफूट पाणी मनमाडसह नांदगाव तालुक्‍यासाठी प्रस्तावित आहे. ते गोदावरी खोऱ्यात वळवून तालुका वंचितच ठेवण्यात आला. 
-अशोक परदेशी, सामाजिक कार्यकर्ते 
... 
चाळीस वर्षांपासून पाणीप्रश्‍न आहे. प्रत्येक निवडणुकीत आश्‍वासन दिले जाते. मात्र निवडणूक झाली, की त्यावर पाणी फिरते. मात्र अद्यापही पाणीटंचाईतून मनमाडकरांची सुटका झालेली नाही. त्यामुळे शहराचा विकास खुंटला. बेरोजगारीचा प्रश्‍नही भेडसावत आहे. 
-अनिल निरभवणे, सामाजिक कार्यकर्ते 
----------------

 

Web Title: marathi news GROUND REPORT