सकाळ  ग्राउंड रिपोर्ट  कळवण--  कळवणचे पाणी पळविण्यासाठी पवार कुटुंबात पाडली फूट 

सकाळ  ग्राउंड रिपोर्ट  कळवण--  कळवणचे पाणी पळविण्यासाठी पवार कुटुंबात पाडली फूट 

    कळवण म्हणजे ए. टी. पवार, असे राजकीय समीकरण बनलेला आदिवासीबहुल धरणांचा तालुका, अशी ओळख. पण तालुक्‍यातील पाण्यावर इतर अधिकार गाजवतात, अशी थेट तक्रार कळवणकर भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांविरुद्ध करताहेत. पाणी पळवून नेण्यासाठी धरणातील आवर्तनांचा कालावधी कमी करूनही भागत नाही म्हटल्यावर आता थेट पवार कुटुंबात फूट पाडल्याचा आरोप लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिकांकडून होऊ लागला आहे. धनगर समाजाला आदिवासींचे लाभ देण्याच्या सरकारच्या निर्णयाला या तालुक्‍यातून विरोध प्रकर्षाने पुढे आला. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण आदिवासी भागाने व्यापलेला असून, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेतीशी सांधलेल्या कुटुंबांची संख्या 90 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शेतकरी, व्यापारी, तरुण नेमक्‍या कोणत्या मुद्यांचा विचार करताहेत, हे जाणून घेण्यासाठी कळवण बाजार समितीच्या आवारात संवाद साधण्यात आला. संवादाची सुरवात देवीदास पवार यांनी केली. कांदा निर्यातीचे लांब पल्ल्याचे धोरण आखायला हवे इथंपासून ते व्यापाऱ्यांनी सर्वत्र शेतकऱ्यांच्या कांद्याला सारखा भाव द्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी मांडली. विनोद खैरनारांनी कांद्याचे भाव वाढू नयेत म्हणून व्यापाऱ्यांना धमकावण्यापासून त्यांच्यावर छापा टाकण्यापर्यंतचे पाऊल उचललेले जात असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटल्याची तक्रार करत शेतकरी सरकारला माफ करणार नाहीत, असे निक्षून सांगितले. राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपने उमेदवार बदलल्याने कार्यकर्ते नाराज झाल्याचे नरेश गरुड यांनी स्पष्ट केले. 

शेती उजाड होऊ नाही देणार 
भाजपने हरिश्‍चंद्र चव्हाणांची उमेदवारी कापल्याबद्दल ऍड. मनोज शिंदे यांनी नाराजीचा सूर आळवला. तसेच त्यांनी नेमका कुठे सर्व्हे केला? पालकमंत्री सुरगाण्यात गेले होते का, असे विविध प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केलेत. डॉ. भारती पवार या कळवण तालुक्‍यातून जिल्हा परिषदेसाठी विजयी झाली असल्या, तरीही लोकसभेची निवडणूक वेगळी आहे, अशीही टिप्पणी उपस्थितांनी केली. संदीप वाघ आणि देवीदास पवार यांनी कळवणचे पाणी पळविण्याबद्दलची नाराजी व्यक्त केली. सटाणाकरांना पाणी देण्यासाठी आमचा विरोध नाही; परंतु आमची शेती उजाड होण्यासाठी बंद पाइपमधून पाणी देण्याऐवजी कालवा-पाट-नदीतून पाणी द्यायला हवे, असे श्री. पवार यांनी म्हटले. श्री. वाघ यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री यांना कळवणचे पाणी द्यायचे काय, असा प्रश्‍न उपस्थित केला. आमदार जे. पी. गावित यांनी पाणीप्रश्‍नी प्रशासनाने विचारले नाही असे म्हटले, तर मग त्यांनी आंदोलनाचा मार्ग का स्वीकारला नाही, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या ऐरणीवर 
सुनील देवरे, शबान पठाण, द्राक्ष उत्पादक अनिल पगार, देवा भुजाडे, डॉ. दीपक शेवाळे, बेजचे केदा जगताप, डॉ. किशोर कुवर आदींनी संवादात सहभाग नोंदवला. मतदारसंघात छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायाचा आवाज उठणार असल्याचे अविनाश शेवाळे यांनी सांगितले. धनगर समाजाला माहिती आहे, की ते आदिवासी नाहीत. तरीही राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी आदिवासींच्या सवलती देण्याची घोषणा केली जाते, असे सांगून डी. एम. गायकवाड यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या हेळसांडीचा प्रश्‍न मांडत विद्यार्थ्यांचा मोर्चा दडपण्यासाठी झालेल्या प्रयत्नांबद्दल खेद व्यक्त केला. 


ओतूर प्रकल्पाबद्दलची नाराजी 
ओतूर प्रकल्प खोळंबल्याबद्दलची नाराज उघड झाली. सरकारला धरण बांधता येत नसल्यास आमच्या खात्यावर पैसे वर्ग करा, आम्ही धरण बांधू, अशा शब्दांत दीपक भुजाडे या तरुणाने थेट आव्हान दिले. नार-पार, दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्पाबद्दल काहीही न सांगता करार करण्याची का घाई झाली, असा प्रश्‍न उपस्थित केला गेला. दीपकने भूमिहीनांसाठी एखादी प्रभावी योजना दाखवावी, मी वर्षभर तुमच्याकडे फुकट काम करेन, असे आव्हान दिले. 

राहुल गांधींशी का नाही साधत संवाद? 

गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी जीएसटीला विरोध केला. पंतप्रधान झाल्यावर घाईघाईत जीएसटीचा निर्णय घेतला. एक हजार 369 जीआर काढले. याबद्दलची तक्रार करत कळवण मर्चंट बॅंकेचे माजी अध्यक्ष किशोर वेणे यांनी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे चर्चा करण्याचे आव्हान देतात, मग त्यांच्याशी संवाद का साधला नाही, असा प्रश्‍न उपस्थित केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com