लोगो  सकाळ  ग्राउंड रिपोर्ट- दुष्काळमुक्तीसाठी सिन्नरच्या 60 गावांचा समग्र विचार महत्त्वाचा 

लोगो  सकाळ  ग्राउंड रिपोर्ट- दुष्काळमुक्तीसाठी सिन्नरच्या 60 गावांचा समग्र विचार महत्त्वाचा 

    सिन्नरच्या दुष्काळमुक्तीसाठी कडवामधून पाणी घेण्यासंबंधीचे सूतोवाच तत्कालीन आमदार शंकरराव नवले यांनी केले होते. त्यानंतरही निवडणुका आल्या, की हा विषय ऐरणीवर येत राहिला अन्‌ निवडणुका झाल्यावर "ये रे माझ्या मागल्या' ही स्थिती कायम राहिली. नेमक्‍या अशा स्थितीत दुष्काळावर मात करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या "युवा मित्र' संस्थेचे प्रमुख सुनील पोटे यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी हरसुले गाव ते मिरगाव या पट्ट्यातील 55 ते 60 कोरड्या गावांचा समग्र विचार करायला हवा, असे अधोरेखित केले. 

पश्‍चिम पट्ट्यातील पांढुर्ली, शिवडे, घोरवड अशा परिसरात पाण्याची उपलब्धता, नायगाव, जायगावला गोदावरीचे पाणी, पाथरे-शहा परिसरातील एक्‍स्प्रेस कॅनॉल, भोजापूर खोरे अशा सर्वसाधारण रचना स्पष्ट करून पोटे म्हणाले, की गेल्या वीस वर्षांपासून युवा मित्र संस्थेचे काम सुरू आहे. ग्रामीण विकास हा मूळ उद्देश आहे. पाणी, शेती, शेतीपूरक व्यवस्था यावर काम केले जाते. देवनदीचे पुनरुज्जीवन केले. जिल्ह्यातील दहा तालुक्‍यांत असलेल्या 296 ब्रिटिशकालीन बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा उपक्रम राबविण्यात येतो. देवनदीवरील 18 आणि म्हाळुंगीच्या चार बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. बंधारे आणि धरणातील गाळ काढण्याने पाण्याचा पाझर सहा ते सोळा पटीने वाढतो. कोनांबे धरणातील तीन लाख 80 हजार ट्रॅक्‍टर इतका गाळ काढला. हा गाळ 250 एकर शेतीसाठी नेण्यात आला. याशिवाय नांदगाव, मालेगाव, देवळा, चांदवड, येवला, सिन्नर तालुक्‍यांतील बंधाऱ्यांमधील गाळ काढण्यासाठी 50 मशिन देण्यात आल्या. खरे म्हणजे, पाण्याची उपयोगिता वाढविणे, पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून सक्षमीकरण करणे, पाण्यावरचा अधिकार निश्‍चित करत त्याचा वापर करणे यावर काम सुरू आहे. 


पर्जन्यमानाची विसंगती 
एकाच तालुक्‍यात पर्जन्यमानाच्या असलेल्या विसंगतीवर पोटे यांनी बोट ठेवले. धोंडबारला दोन हजार, बारा किलोमीटरवर साडेपाचशे आणि पंधरा किलोमीटरवर साडेतीनशे मिलिमीटर एवढे पर्जन्यमान होते, असे सांगून ते म्हणाले, की सिन्नर तालुक्‍यातील 129 गावांचा दुष्काळमुक्तीसाठी विषय ऐरणीवर येऊनही गावे कोरडी राहिली आहेत ही वस्तुस्थिती आहे. दोडी, खंबाळे या भागात जमिनीतील क्षार वर यायला लागले आहेत. देवनदीचे पाणलोट क्षेत्र 722 चौरस किलोमीटरचे आहे. जामनदी चाळीस किलोमीटरपर्यंत आहे. कोरड्या गावातील "वॉटर बजेटिंग' करण्यात आले आहे. पीकपद्धती निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन झाल्यास पाच वर्षांमध्ये कोरड्या गावांमध्ये सकारात्मक बदल दिसतील आणि आर्थिक उत्पन्नात भर पडलेली दिसेल. म्हणूनच पाणी हा विषय साठमारीचा होता कामा नये. 

बारमाही भाजीपाला घेणे शक्‍य 
कोरड्या गावांचे भविष्य खूपच चांगले आहे. शाप असलेल्या दुष्काळात काम करण्याच्या संधी मोठ्या प्रमाणात असून, इथल्या हवामानाचा अभ्यास केल्यावर बारमाही भाजीपाल्याचे उत्पादन घेणे शक्‍य आहे. पंधरा प्रोड्यूसर कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. इथले तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस राहते. शिवाय अधिक पाऊस नाही. हे भाजीपाल्यासाठी पोषक आहे, असा आशावाद मांडत असताना दुष्काळातून बाहेर पडण्यासाठीची दिशा पोटे यांनी स्पष्ट केली. 

पाण्यासाठीच्या काही अपेक्षा 
0 पाचशे कोटींचे डाळिंब पिकविणाऱ्या सिन्नरमध्ये पाण्याने होईल धूम. 
0 कुक्कुटपालन, शेळीपालन, दूध अशा विविध नोंदणीकृत कंपन्यांना मिळेल चालना. 
0 किती कोटींच्या योजनांपेक्षाही पाणी कधी व कसे मिळेल हे महत्त्वाचे. 
0 निवडणुका संपल्या, की प्रशासन-सरकार-सामाजिक संस्थांनी एकत्र निर्णय घेण्याची गरज. 
0 राजकारण कमी आणि समाजकारण अधिक व्हावे. 
0 पाणलोट घटक धरून काम व्हायला हवे आणि सकारात्मक धोरणाची आवश्‍यकता. 
0 प्रश्‍न विचारले जातात म्हणून सामाजिक-स्वयंसेवी संस्थांना टाळणे थांबावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com