सकाळ  ग्राऊंड रिपोर्ट- देवमामलेदार महाराजांच्या नगरीला पाण्याची आस   

residentional photo
residentional photo

   यशवंत महादेव भोसेकर. महसूलमध्ये मामलेदार म्हणून सटाणामध्ये ते निवृत्त झाले. 1870-71 मध्ये दुष्काळ पडला असताना त्यांनी सरकारी खजिन्यातून लाखो रुपये जनतेला दिले. मदतीला मामलेदार धावून आले म्हणून जनतेने त्यांना देवत्व दिले. सटाणाकरांनी त्यांचे मंदिर बांधले आणि 1900 मध्ये यात्रोत्सव सुरु झाला. पूनंद धरणाचे पाणी आटले अन्‌ पंधरा दिवसांपासून नगरीला पाण्याची आस लागली. बोअरबरोबरच टॅंकरच्या विकतच्या पाण्यावर तहान भागावावी लागत आहे.

     धुळे लोकसभा मतदारसंघात बागलाण विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहे. त्याचे मुख्यालय म्हणजे, सटाणा. या मतदारसंघातील मतांसाठी चुरस असली, तरीही केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अन्‌ कॉंग्रेसचे कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी मताधिक्‍यासाठी जंगजंग पछाडले आहे. या निवडणुकीत सटाणाकरांच्या नेमक्‍या काय अपेक्षा आहेत? हे जाणून घेण्यासाठी देवमामलेदार महाराजांच्या मंदिरात संवाद साधण्यात आला. डॉ. दौलतराव गांगुर्डे, अमोल बच्छाव, दादा खरे, बाळासाहेब देवरे, दत्तू सोनवणे, ऍड्‌. सोमदत्त मुंजवाडकर, महेंद्र शर्मा, बाबूलाल मोरे, भालचंद्र बागड, राजेंद्र खैरनार, पंकज दळवी, संजय बगडाणे, जगन देवरे आदींनी संवादात भाग घेतला. नाशिककरांनी लोकसभेत बिनविरोध निवडून पाठवल्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी एच. ए. एल. चे "गिफ्ट' दिले होते. याच पार्श्‍वभूमीवर सटाणाकरांना काय वाटते? हे जाणून घेतल्यावर डॉ. भामरेंनी प्रश्‍न सोडवण्यासाठी मंत्रीपदाचा उपयोग केला असे सांगत असतानाच बेरोजगारीचा प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी केंद्र सरकारच्या कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली जावी अशी अपेक्षा पुढे आली. औद्योगिक वसाहतीचा फलक लागला पण पाणी, विजेचा प्रश्‍न मार्गी लागले नसल्याने कारखाने कसे उभे राहतील? असा प्रश्‍न उपस्थित झाला. 

श्रेयवादात रखडल्या पाणीयोजना 
श्रेयवादात पाणीयोजना रखडल्याची खदखद ऐकायला मिळाली. केळझर डावा कालव्याचा विषय निघतो पण चारीचे काम का होत नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाला. पावसाचे पाणी वाहून जाते, परंतु ते अडवले जात नाही याबद्दलचा संताप मांडला गेला नाही. तसेच हरणबारी डावा कालवा 300 मीटरपर्यंत रखडला असल्याने 3 हजार हेक्‍टर क्षेत्र पाण्यावाचून वंचित राहिल्याकडे सटाणाकरांनी लक्ष वेधले. हरणबारीबरोबर केळझर, पूनंद, चणकापूरच्या आवर्तनाकडे चातकासारखी वाट पाहणाऱ्यांना पूनंदमधून मिळणाऱ्या पाण्याच्या राजकारणाची उबग आल्याचे बऱ्याच जणांच्या बोलण्यातून डोकावले. पाट, नदीतून पाणी नेण्यासाठी आमचा विरोध नसल्याचे शेतकरी खुलेआम सांगताहेत. मग पाईपलाईनचा आग्रह का? हे पाण्यासाठी आग्रही असलेल्या शहरवासियांनी पाण्याचा अपव्यय टाळेल, असे उत्तर दिले. मात्र उध्वस्थ होणाऱ्या शेतीचे काय करायचे? या प्रश्‍नाला उत्तर मिळाले नाही. 

धगधगणारे प्रश्‍न 
ट्रॉमा केअर सेंटर का झाले नाही सुरु? 
सटाणा बायपासवरील मृत्युच्या सापळ्यातून कधी होणार सुटका? 
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार कधी? 
नळाला कायमस्वरुपी पाणी कधी मिळणार?
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com